प्रशांत माने
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण: चोरी, लुटमारी, खून, दरोडे, हातचलाखीसह अन्य गुन्हे सातत्याने घडत असताना ऑनलाईन फसवणुकीचे पेव कोरोनाकाळात वाढले. या गुन्ह्यांनी पोलिसांपुढे आव्हान उभे केले आहे. हे वाढते प्रकार पाहता अनोळखी माणसाने कॉलसाठी मोबाइल मागितल्यास देऊ नका. या माध्यमातून ओटीपी नंबर मिळवून बँक खात्यातील रक्कम क्षणात गायब केली जाऊ शकते. त्यामुळे सतर्कता बाळगणे आवश्यक आहे.
डिजिटल इंडिया, कॅशलेस इंडियाच्या माध्यमातून आजमितीला बहुतांश नागरिक ऑनलाईन व्यवहार करीत आहेत. यात पैशांची देवाण-घेवाण सातत्याने केली जात आहे. आजघडीला प्रत्येकजण ॲन्ड्रॉइड मोबाइल वापरत आहेत. त्याचा दहा अंकी क्रमांक बँक खात्याशी जोडलेला असतो. ऑनलाइन देवाण-घेवाण करताना खबरदारी म्हणून ओटीपी मागविण्यात येतो. फसवणूक करणारी अनोळखी व्यक्ती बक्षिसाचे तसेच लॉटरी लागल्याचे आमिष दाखवून तो नंबर मिळवून बँकेतील रकमेवर डल्ला मारते. हे प्रकार सातत्याने घडत आहेत. ओटीपी कोणालाही शेअर करू नये असे आवाहन वारंवार केले जाते; परंतु घडणाऱ्या घटना पाहता पोलिसांच्या आवाहनाकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे स्पष्ट होत आहे.
------------------------------------------
ओटीपीसाठी अशी होते फसवणूक
कॉल करण्यासाठी मोबाइल घेऊन माझा रिचार्ज संपला आहे, मला तत्काळ संपर्क करायचा आहे तुमचा मोबाइल देता का असे सांगून अनोळखी व्यक्ती मोबाईल मागतो. त्याची तातडीची गरज म्हणून आपण मोबाइल त्याच्याकडे सुपूर्द करतो; मात्र यातच घोळ होऊन काही कालावधीतच आपले पैसे दुसऱ्या खात्यात वळते होऊन फसवणूक होते.
-----------------
वेगळी लिंक पाठवून
मोबाइलवर इ-मेल व मेसेजच्या माध्यमातून लिंक पाठवली जाते. लिंकवर क्लिक केल्यावर विविध प्रश्नांमधून बँक खात्याची डिटेल्स विचारली जातात. यासोबतच ओटीपी नंबर मागितला जातो. डिटेल्स देताच क्षणात खात्यातील पैसे इतर खात्यात वळविले जातात.
-----------------
लॉटरी लागली आहे असे सांगून
तुम्हाला लॉटरी लागली आहे. तुमचा तपशील पाठवा असे फेक मेसेज आणि ई-मेल सर्रासपणे पाठविले जात असून यात बक्षिसाची रक्कम पाहून भुरळ पडलेला व्यक्ती अलगद हॅकर्सच्या जाळ्यात अडकते आणि आपले आर्थिक नुकसान करून घेते.
-----------------
केवायसीसाठी आवश्यक असे सांगून
तुमची बँक खात्याची केवायसी अपडेट करायची आहे. ओटीपीशिवाय केवायसी अपडेट होत नाही असे सांगून फसवणूक केली जाते.
-----------------------------------------------
ही घ्या काळजी
१)परिचयाचा असेल अथवा अनोळखी माणसाच्या हातात आपला मोबाइल देऊ नका. तो दिला असेलतर त्याच्यावर लक्ष ठेवा. एखादी व्यक्ती अडचणीत असल्याचे सांगून तो मागत असेल तर त्याच्या प्रत्येक हालचालीवर पूर्णत: लक्ष ठेवा. पिन नंबर, सीसीव्ही नंबर सेव्ह करून ठेवू नका
२)कोणतीही बँक आपला ओटीपी कधीच मागत नाही. त्यामुळे ओटीपीसाठी कोणी काहीही कारण सांगत असेल तर त्याच्यावर विश्वास ठेवू नका.
३) दुसऱ्याच्या सांगण्यावरून अनोळखी ॲप डाऊनलोड करू नये. लाखो रुपयांचे आमिष दाखवूनही बँक डिटेल्सची मागणी केली जाते अशांना प्रतिसाद देऊ नये.
--------------------------------------------------
सायबर सेल
मोबाइलचा गैरवापर होऊ देऊ नका सोशल मीडिया तसेच लिंकच्या माध्यमातूनही बँकेतील रक्कम काढल्याच्या तक्रारी पोलिसात दाखल होत आहेत. नागरिकांनी सतर्कता बाळगणे गरजेचे आहे. सायबर गुन्ह्यांबाबत विशेष मार्गदर्शन सत्रही आयोजित केले जातात.
----------------------------------