ठाणे : सध्या सबंध देशात महागाईचा आगडोंब उसळला आहे . अशा स्थितीत ठाणे महानगर पालिकेकडून आगामी अर्थसंकल्पात करवाढ केल्यास महागाईने पिचलेल्या ठाणेकरांचे कंबरडेच मोडेल. त्यामुळे अर्थसंकल्पात करवाढ करू नये, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी -शरदचंद्र पवार या पक्षाने केली आहे. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस जितेंद्र आव्हाड यांच्या आदेशानुसार जिल्हाध्यक्ष सुहास देसाई, युवक अध्यक्ष विक्रम खामकर, विद्यार्थी अध्यक्ष प्रफुल कांबळे , हॉकर्स सेलचे अध्यक्ष सचिन पंधरे, ठाणे शहर विधानसभा अध्यक्ष महेंद्र पवार,उपाध्यक्ष संजीव दत्त्ता,रोहिदास पाटील,राजेश साटम,संदीप यादव,फिरोज पठाण,संदीप पवार यांच्या शिष्टमंडळाने आज ठामपा आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेऊन निवेदन दिले.
शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनानुसार, सध्या देशात महागाईने उच्चांक गाठला आहे. धान्यापासून इंधनापर्यंत सर्वच बाबी प्रचंड महाग झाल्या आहेत. या महागाईमुळे सामान्य नागरिकांना जगणे नकोसे झाले आहे. ठाणेकर नागरिकही या महागाईच्या फेऱ्यातून सुटलेले नाहीत. कोरोनानंतर अनेकांच्या उत्पन्नावर मर्यादा आल्या आहेत. उत्पन्नाला मर्यादा आलेल्या असताना महागाई मात्र अमर्याद वाढत आहे. अशा स्थितीमध्ये नव्याने करवाढ झाली तर सामान्य ठाणेकरांचे कंबरडे मोडले जाणार आहे. लवकरच ठाणे महानगर पालिकेचे वार्षिक अंदाजपत्रक तथा अर्थसंकल्प मांडले जाणार आहे. राज्यातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांचे आर्थिक गणित बिघडलेले असले तरी आजमितीला करवाढ केल्यास ते ठाणेकरांसाठी अन्यायकारक ठरणार आहे. त्यामुळे आगामी अर्थसंकल्पात मालमत्ता, पाणी आदी करांमध्ये तसेच टीएमटीच्या तिकिट दरांमध्ये वाढ करू नये, अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, सुहास देसाई यांनी, ठाणेकरांना अधिकची आर्थिक झळ सोसावी लागू नये, यासाठी आयुक्तांना करवाढ न करण्याची विनंती केली आहे. आयुक्तांनीही त्याबाबत सकारात्मकता दाखवली आहे, असे सांगितले.