ठाणे : रस्ते दुरुस्तीसाठी वाहतूक पोलिसांच्या वतीने वाहतूक बदल केले जात आहेत. तसेच शहरातील काही ठिकाणी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी रस्तेच बंद करण्यात आले आहेत. परंतु वाहतूक बदलाच्या या मनमानी मुद्यावरुन मनसे आक्रमक झाली आहे. केवळ उपचार म्हणून बैठक घेऊन अन्यायकारक वाहतूक बदल ठाणेकरांच्या माथी मारु नका असा इशारा मनसेने दिला आहे. यामुळे वाहतूक बदल करण्यापूर्वी गडकरी रंगायतन येथे बैठक घ्यावी अशी मागणी केली आहे. परंतु तसे न झाल्यास या अन्याया विरोधात व्यापक आंदोलन उभे केले जाईल, असा इशाराही मनसेचे ठाणे - पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिला आहे.
रस्ते दुरुस्तीसाठी काही दिवसांपूर्वी मुंब्रा बायपास बंद करण्यात आला. त्यानंतर ही दुरुस्ती होत असतांना, साकेत आणि खारेगाव पुलावरील एक मार्गिका टप्याटप्याने दुरुस्तीसाठी बंद करण्यात आली. त्यामुळे माजिवडा ते घोडबंदर पर्यंत आणि मुंबईवरुन येतांना नितिन कंपनीच्या बाजूपर्यंत वाहतूक कोंडी होत आहे. यामुळे ठाणेकर वैतागला आहे. तसेच शहराच्या इतर भागात देखील रस्ते दुरुस्तीची कामे एकाच वेळेस हाती घेण्यात आली आहेत. त्यामुळे देखील शहराच्या विविध भागात वाहतूक कोंडी होत आहे. त्यात आता ठाणे शहरातील जुना कोपरी रेल्वे पूल ते भास्कर कट येथील नवीन सब वे व भास्कर कट ते नवीन कोपरी रेल्वे ब्रिजचे सुरुवातीस खोदकाम करून डांबरीकरणाचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे या ठिकाणची वाहतूक पूर्णपणे बंद ठेवून पयार्यी मागार्ने वळविण्यास सुरवात झाली आहे. २६ एप्रिल ते २१ मे पर्यंत हे काम होणार असल्याने येथील वाहतूकीत देखील बदल करण्यात आला आहे.परंतु एकाच वेळेस अशा पध्दतीने शहरातील विविध रस्त्यांची कामे हाती घेण्यात आल्याने वाहतूकीत बदल केले जात असतांना ठाणेकरांना विश्वासात घेतले जात नसल्याचा आरोप मनसेने केला आहे.
वाहतूक बदल करीत असतांना काही ठराविक आपल्याला अनुकुल असलेले नागरीक बैठकीला बोलावून वाहतूक बदल केले जात आहेत. परंतु ते सर्वसामान्यपर्यंत पोहचत नसल्याचे मनसेचे म्हणने आहे. त्यामुळे वाहतूक बदल करण्यापूर्वी गडकरी रंगायतन येथे बैठकीचे आयोजन करावे, त्या ठिकाणी सर्वांची मते घ्यावीत त्यानंतरच वाहतूक बदल करावेत अशी सुचना मनसेने केली आहे. केवळ उपचार म्हणून बैठक घेऊन अन्यायकारक वाहतूक बदल ठाणेकरांच्या माथी मारु नयेत असा इशाराही मनसेने दिला आहे. त्यामुळे वाहतूक बदलाची नव्याने बैठक घेऊन त्यानंतरच वाहतूक बदल करावेत, अन्यथा व्यापक आंदोलनाशिवाय पर्याय राहणार नसल्याचा इशारा जाधव यांनी दिला आहे. या संदर्भातील पत्र त्यांनी वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्तांना दिले आहे.