ठाणे : कळवा परिसरात शिवसेना वाढावी म्हणून मी प्रयत्न करत होतो. मात्र, त्याचवेळी आदित्य ठाकरे यांनी मला फोन करून जितेंद्र आव्हाड यांना विरोध करू नका, असा दम दिला होता, असा गौप्यस्फोट शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांनी शुक्रवारी केला. हिंदुगर्वगर्जना या कार्यक्रमात ते बोलत होते.
कळवा परिसरात आगामी महापालिकेत शिवसेनेचे अधिकाधिक नगरसेवक निवडून यावे याकरिता मी आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे प्रयत्न करत होतो. त्याकरिता आम्ही मेळावे घेतले. मात्र, त्याचवेळी आमचे छोटे सरकार अर्थात आदित्य ठाकरे यांनी मला फोन करून आव्हाड यांना विरोध करू नका, असा दम दिला होता, असे म्हस्के यांनी भाषणात सांगितले. एकीकडे महापालिकेच्या कामकाजात, महासभेत राष्ट्रवादी काँग्रेस सातत्याने आम्हाला विरोध करत होती. असे असताना दुसरीकडे आव्हाड यांना विरोध नका, अशी आदित्य यांची भूमिका होती. राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनाविरोधी भूमिका घेत असताना आम्ही मूग गिळून गप्प का बसायचे, असा प्रश्न मला पडला होता.
बीकेसी येथील दसरा मेळाव्याकरिता ठाणे या एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यातून ३० हजार शिवसैनिक घेऊन जाण्याचे लक्ष्य निश्चित केल्याचे म्हस्के यांनी सांगितले. त्यासंदर्भात नगरसेवकांनाही सूचना दिल्याचे त्यांनी सांगितले.