ठाणे : माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीच्या साहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर सध्या शहराच्या विविध भागांत फेरीवाल्यांवर कारवाई सुरू आहे. आता सोमवारी होणाऱ्या महासभेतदेखील याचे पडसाद उमटणार आहेत. या फेरीवाल्यांवर कारवाई होऊ नये म्हणून काही राजकीय मंडळींनी दबाव वाढविल्याची माहिती समोर येत आहे. फेरीवाला धोरणावरूनदेखील ते महासभेत प्रशासनाला जाब विचारणार आहेत. त्यामुळे महापौर याबाबत काय भूमिका घेणार, दबाव झुगारून फेरीवाल्यांवर कारवाईचे आदेश देणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
सोमवारी पिंपळे यांच्यावर फेरीवाल्याने हल्ला केला होता. त्यानंतर शहराच्या सर्वच भागांत फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात येत आहे. परंतु, यामुळे फेरीवाल्यांकडून जो काही हप्ता गोळा होत होता, त्यालादेखील यानिमित्ताने खीळ बसली आहे. यामुळे हप्तेखोरांची एक मोठी साळखी दुखावली गेली आहे. काहींनी तर या फेरीवाल्यांकडून हप्ते गोळा करून कोट्यवधींची माया गोळा केली आहे. त्यामुळे अशा काही राजकीय किंवा इतरांकडून आता फेरीवाल्यांवर कारवाई करू नये यासाठी दबाव आणण्याचा प्रयत्न सुरू झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीदेखील फेरीवाल्यांवर कारवाईचे आदेश दिलेले आहेत. त्यामुळे आता महासभेत यावर काय चर्चा होणार, फेरीवाल्यांवर कारवाई होणार की त्यांच्या बाजूने काही निकाल दिला जाणार, याकडे लक्ष लागले आहे.
फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी होणार?
महापौर नरेश म्हस्के यांच्यावर यापूर्वीदेखील अनधिकृत बांधकामे असतील किंवा फेरीवाले असतील त्यांच्यावरील कारवाई टाळण्यासाठी दबाव आणला गेला होता. त्यामुळे ते आता महासभेत काय भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तसेच फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी होणार का? हेदेखील पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
-------------