ठाण्यात राहणारा प्रणय गोमाशे हा एक उत्तम गायक असून त्याचा स्वत:चा म्युझिक बॅण्ड आहे. त्याने चंद्रपूर येथील सरदार पटेल महाविद्यालयातून एम. कॉम, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, नागपूर विद्यापीठातून बीए म्युझिक आणि छत्रपती शाहूजी महाराज कानपूर मुक्त विद्यापीठातून संगीत विभागातून एम. ए. म्युझिकचे शिक्षण घेतले आहे. प्रणयचे आजोबा काकड आरतीला जायचे. तसेच वडिलांना भजनाची आवड असल्यामुळे तो वारसा त्याला लाभला. पुढे करिअर करण्यासाठी प्रणयने मुंबई गाठली.
प्रणय सांगतो की, मुंबईमध्ये संगीताचे शास्त्रोक्त शिक्षण घेत असताना सहकारी मित्रमंडळी कार्यक्रम करत होते. प्रणय जी म्युझिशियन अॅण्ड बॅण्डच्या माध्यमातून मराठी, हिंदी, वेस्टर्न, अभंग, भक्तिगीते इत्यादी संगीताच्या वेगवेगळ्या तºहा लोकांसमोर नव्याने सादर करण्याचा एक प्रयत्न सुरू आहे. जुन्या गाण्यांच्या संयोजनाला धक्का न लावता आधुनिक वाद्यांचा वापर करून आमच्या बॅण्डला युनिक बनवते. गायनाव्यतिरिक्त मला नवनव्या ठिकाणी फिरायला आवडते. खासकरून निसर्गाच्या सान्निध्यात मुक्त विहार करायला आवडतो, नवीन लोकांना भेटणे, ट्रेकिंग, वाचन, इत्यादी आवडीनिवडी आहेत. विविध राज्यस्तरीय गायन स्पर्धा, आंतरविद्यापीठ गायन स्पर्धा, जागतिक सांस्कृतिक महोत्सव इत्यादी स्पर्धेत सहभाग घेतला असून विविध सामाजिक संघटनांमार्फत देण्यात येणाऱ्या ‘युवा पुरस्कारा’ने गौरविण्यात आले आहे. सुप्रसिद्ध गायक सुरेश वाडकर गुरुजींशी झालेली पहिली भेट आणि गाणं ऐकल्यावर त्यांनी दिलेले कौतुकाची थाप मी आयुष्यात कधीही विसरू शकणार नाही. आयुष्यात मोठे ध्येय ठेवा, मिळालेल्या कामाबद्दल प्रामाणिक राहा, थांबू नका शेवटी यश मिळेल, असा संदेश प्रणयने तरुण पिढीला दिला आहे.- प्रणय गोमाशे, गायक