कल्याण : पश्चिमेकडील उंबर्डे परिसरातील आयटीआयची इमारत आठ दिवसांत तंत्रशिक्षण विभागाला हस्तांतरित न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने दिला आहे. याबाबत शनिवारी सार्वजनिक बांधकाम (पीडब्ल्यूडी) विभागातील अधिकाऱ्यांची भेट घेत त्यांना निवेदन देण्यात आले.
कल्याण आणि आजूबाजूच्या परिसरातील विद्यार्थ्यांची गरज लक्षात घेऊ न उंबर्डे येथील सरकारी भूखंडावर आयटीआयची इमारत उभारण्यात आली आहे. यासाठी मनसेचे माजी आमदार प्रकाश भोईर यांनी पाठपुरावा केला होता. चार ते पाच वर्षांपूर्वीच या इमारतीचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, तांत्रिक आणि किरकोळ बाबींच्या पूर्ततेसाठी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि तंत्रशिक्षण विभागाची एकमेकांकडे बोट दाखवून लपवाछपवी सुरू असून संबंधित विभाग विद्यार्थ्यांच्या भविष्याशी व पालकांच्या भावनांशी खेळत असल्याचा आरोप मनविसेने केला आहे. दरम्यान, मनविसेचे कल्याण शहराध्यक्ष विनोद केणे यांच्यासह रोहन पोवार, सचिन पोपलाईतकर, रोहन आक्केवार, रोहित भोईर, रूपेश पाटील, पॉली जोसेफ, हर्ष गांगुर्डे आदी पदाधिकारी आणि अन्य शाखाध्यक्षांनी शनिवारी सार्वजनिक बांधकाम विभागाला भेट देत तेथील अधिकाऱ्यांना निवेदन दिले.