कल्याण : कोपर रेल्वे उड्डाणपुलाचे काम ऑगस्ट अखेरपर्यंत पूर्ण होईल, असे केडीएमसीने स्पष्ट केले आहे. परंतु, पुलाचे काम संथगतीने सुरू असल्याने ‘आश्वासनांचेच पूल आणि डोंबिवलीकरांना कायम हूल’, अशी टीका मनसेचे आमदार राजू पाटील यांनी केली आहे.
पाटील म्हणाले की, मनपाला कोरोना इन्होव्हेशन अवॉर्ड नुकताच केंद्र सरकारकडून मिळाला आहे. कोपर पुलाचे काम रखडल्याने मनपास ‘आश्वासनवाले प्रशासन’ असा एक पुरस्कार द्यायला हरकत नाही. प्रशासनाने कधी कोरोनाचे तर कधी पावसाचे कारण देत लोकांची गैरसोय अजून वाढवून ठेवली आहे. यापूर्वी प्रशासनाने आश्वासन दिले होते की, हा पूल सहा महिन्यांत खुला करू. त्यानंतर हा पूल पावसाळ्यापूर्वी पूर्ण करणार. मात्र पूल काही पूर्ण झालेला नाही. त्यानंतर जुलैपर्यंत काम होईल, असे सांगितले. आता ऑगस्टची डेडलाइन दिली गेली आहे. त्यामुळे हा आश्वासनांचा पूल बनला आहे. तारीख पे तारीख, शिवाय मनपाकडे उपाय नसेल तर त्यांनी तसे सांगावे. त्यावर आम्ही उपाय सांगतो.
दरम्यान, आम्हाला आमचा हरवलेला पूल हवा आहे, या आशयाची पोस्ट त्यांनी सोशल मीडियावर टाकली आहे. तसेच केडीएमसी प्रशासनासही पाठविली आहे.
------------------------------