बदलापूर: मंगळवारी सकाळी आठ वाजताच्या दरम्यान बदलापूर स्थानकात आलेल्या लोकलचे दरवाजे आतील प्रवाशांनी बंद केल्याने गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. अखेर याप्रकरणी रेल्वे सुरक्षा बलाने कारवाई सुरू केली असून बुधवारी सकाळी वांगणी ते बदलापूर या प्रवासादरम्यान चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
वांगणीमधून चढलेल्या काही महिला प्रवाशांनी बदलापूर स्थानक येण्याआधी लोकलचे दार बंद ठेवले होते. या प्रकारावरून मंगळवारी सकाळी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. अखेर रेल्वे पोलीस आणि रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी हस्तक्षेप करून हे दरवाजे उघडले. पुन्हा बुधवारी असाच प्रकार घडू नये आणि प्रवाशांमध्ये संताप निर्माण होऊ नये यासाठी आज सकाळपासूनच रेल्वे सुरक्षा बलाने कडेकोट बंदोबस्त लावला होता.
बदलापूर स्थानकासह वांगणी रेल्वे स्थानकातून देखील रेल्वे सुरक्षा बलाचे महिला कर्मचारी ट्रेनमध्ये चढल्या होत्या. मात्र पोलिसांचा बंदोबस्त लावल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. मात्र मंगळवारी ज्या महिला प्रवाशांनी लोकलचे दार बंद केले होते त्यांचा शोध रेल्वे सुरक्षा बलाने सुरू केला आहे. मंगळवारी काढण्यात आलेल्या व्हिडिओच्या आधारे महिलांची ओळख पटवण्याचे काम सुरू करण्यात आले आहेत. त्यातील तीन महिलांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात देखील घेतले आहे.
काही दिवसांपूर्वी वांगणीतील महिला प्रवासी आणि बदलापुरातील महिला रेल्वे प्रवासी यांच्यात वादावादी झाली होती. याच वादावादीचा वचपा काढण्यासाठी वांगणीतून लोकल सुटल्यानंतर संबंधित महिलांनी लोकलचे दार बंद केले होते अशी माहिती समोर येत आहे, तर त्याच अनुषंगाने पोलीस देखील तपास करीत आहेत.