ठाणे : जिल्ह्यातील महापालिकांच्या निवडणुका २०११ च्या जनगणनेनुसार होणार असल्याने प्रभागांची संख्या वाढेल व आपल्या राजकीय नशिबाचे दार उघडेल या आशेवर बसलेल्या अनेकांच्या पदरी निराशा आली आहे, तसेच भाजपला सोईस्कर असलेली चारसदस्यीय प्रभाग पद्धती रद्द करून एकसदस्यीय प्रभाग पद्धती राज्य सरकारने स्वीकारल्याने ठाण्याचा शिवसेनेचा गड सर करण्याची स्वप्ने पाहणाऱ्या भाजपला धक्का बसला आहे.
कोरोनामुळे निवडणुका केव्हा होणार, अशी चर्चा मागील काही महिन्यांपासून राजकीय वर्तुळात सुरू होती. निवडणुका चारसदस्यीय, दोनसदस्यीय की एकसदस्यीय प्रभाग पद्धतीने होणार यावरून चर्चा रंगल्या होत्या. भाजपसारख्या राष्ट्रीय पक्षांना वेगवेगळी आरक्षणे असलेली चारसदस्यीय प्रभाग पद्धती सोईस्कर असते. त्याचबरोबर चारसदस्यीय प्रभाग पद्धतीत एक-दोन मातब्बर उमेदवार निवडून आले, तर ते अन्य नगरसेवकांच्या प्रभागातील कामांची जबाबदारी उचलतात. मात्र, छोट्या व प्रादेशिक पक्षांना सर्व आरक्षणांकरिता उमेदवार मिळवणे व चार प्रभागांची जबाबदारी उचलणारे मातब्बर उमेदवार हुडकून काढणे कठीण जाते. त्यामुळे त्यांना एकसदस्यीय प्रभाग पद्धती लाभदायक ठरते. शिवसेनेची सत्ता असल्याने त्यांनी मागील भाजप सरकारचा निर्णय बदलून एकसदस्यीय प्रभाग पद्धती लागू करून भाजपची पंचाईत केली.
येणारी महापालिका निवडणूक २०११ च्या जनगणनेच्या आधारे होणार असल्याने प्रभागांची संख्या वाढणार नाही. वॉर्ड वाढण्याची शक्यता धूसर असल्याने उमेदवारी मिळेल व आपले राजकीय भाग्य उजळेल याकरिता गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या अनेकांना धक्का बसला आहे. काही लोकप्रतिनिधींनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. या निर्णयामुळे प्रत्येक नगरसेवकाला आपापल्या प्रभागात काम करण्याची संधी मिळणार आहे. चारसदस्यीय प्रभाग पद्धतीमध्ये नगरसेवकांमध्ये एकमत होत नसल्याने विकासाला बाधा येत होती. प्रभागातील कामांची जबाबदारी नेमकी कुणाची यावरून वाद होत होते. या निर्णयामुळे हे वाद शमणार आहेत.
येणाऱ्या महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीची मोट बांधायची, तर चारसदस्यीय प्रभाग पद्धती अडचणीची ठरली असती. तिन्ही पक्षांच्या उमेदवारांमध्ये जागावाटप व त्यानंतर त्या प्रभागामधील नागरी कामांची जबाबदारी ही सरकारची डोकेदुखी ठरली असती. त्यामुळे महाविकास आघाडीतील घटक पक्षांमधील ज्या पक्षांना जी जागा मिळेल, त्याची जबाबदारी त्या पक्षाची राहणार आहे. भाजपची मनसेसोबत युती झाली, तर या दोन पक्षांमध्ये जागावाटप होईल; अन्यथा भाजपकरिता सर्व मतदारसंघ खुले होणार असल्याने या पक्षाचे कार्यकर्ते खुश आहेत. महाविकास आघाडीतील जागावाटपामुळे किती बंडखोरी होणार, याकडे प्रत्यक्ष निवडणुकीच्या वेळी भाजपचे लक्ष लागणार आहे.
..........