लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : कोरोनाच्या महामारीतून वाचवण्यासाठी जिल्ह्यातील खासगी व सरकारी रुग्णालयांनी गंभीर रुग्णांवर रेमडेसिविर इंजेक्शनचा औषधोपचार सुरू केला आहे. यास अनुसरून गेल्या महिनाभरात जिल्ह्याभरातील दोन लाख नऊ हजार ६३० कोरोना रुग्णांना ७३ हजार ६२ ''रेमडेसिविर'' इंजेक्शनचा डोस दिल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे या औषधीच्या काळ्याबाजाराला आता आळा घालणे शक्य झाले आहे.
आयसीएमआरच्या मार्गदर्शनानुसार कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी ''रेमडेसिविर''चा वापर अवघा २५ ते ३० टक्के करणे अपेक्षित आहे. मात्र, जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांमध्ये हे प्रमाण ९० टक्के असल्याचे निदर्शनात आले आहे, तर सरकारी रुग्णालयांमध्ये नियमांस अनुसरून २५ ते ३० टक्के रुग्णांसााठी रेमडेसिविरचा वापर होत आहे. मनमानी वापरामुळे जिल्ह्यात या रेमडेसिविरचा तुटवडा झाला आणि त्यातून या इंजेक्शनचा काळाबाजार सुरू झाला. मात्र, आता रुग्णवाढीचे व गंभीरतेचे प्रमाण जिल्ह्यात कमी झाल्यामुळे या औषधींचा पुरवठाही सुरळीत होत असल्याचे समाधान अन्न व औषध विभागाचे सह. आयुक्त पी. बी. मुंदडा यांनी व्यक्त केले.
आयसीएमआरच्या निकषानुसार जिल्ह्यात ''रेमडेसिविर'' या इंजेक्शनच्या मागणीच्या तुलनेत ५० टक्के पुरवठा नेहमीप्रमाणे होत असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्याभरातील सर्व महापालिका क्षेत्रातील, नगरपरिषद आणि ठाणे जिल्हा परिषदेच्या क्षेत्रातील रुग्णालयांनी त्यांच्याकडील दोन लाख नऊ हजार ६३० गंभीर रुग्णांना ७३ हजार ६२ रेमडेसिविरच्या औषधीचा डोस देऊन पुढील उपचार केला. सध्या या इंजेक्शनचा पुरवठा मार्केटमध्ये होत नाही. ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी त्यांच्या नियंत्रणात जिल्हास्तरीय ''रेमडेसिविर नियंत्रण कक्ष'' सुरू केला असून, त्याद्वारे थेट जिल्ह्यातील रुग्णालयांना या इंजेक्शनचा पुरवठा संबंधीत महापालिकांमार्फत होत आहे.