लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : नगरविकास मंत्री व ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी वडिलांसमवेत सपत्नीक येथील सिव्हील रुग्णालयात उपस्थित राहून शनिवारी कोरोना प्रतिबंधात्मक लसचा पहिला डोस घेतला. त्यांच्यासह तब्बल ७८५ जणांनी आज लस घेतली आहे. यात दुसरा डोस घेणाऱ्या ९१ जणांचा समावेश आहे.
सिव्हीलमधील या पहिल्या डोसच्या वेळी उपस्थित जिल्हा शल्य चिकित्सक डाँ. कैलास पवार यांच्यासह उपस्थित डॉक्टर्स, परिचारिका, सपोर्टींग स्टाफ आदी सर्वांचे शिंदे, यांनी आभार मानले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. या सिव्हील रुग्णालयातच गेल्या शनिवारी ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, यांनी या लस चा दुसरा डोस घेतला आहे. याप्रमाणे शिंदे, यांना आता दुसरा डोस दीड महिन्यांनी घेण्याचे आवाहन डाँ. पवार यांनी केले आहे. सिव्हील रुग्णालयात आज ७८५ जणांनी या लसचा डोस घेतला आहे. यामध्ये पहिला डोस ६९४ जणांनी घेतला असून दुसरा डोस आज ९१ जणांनी घेतला आहे.
जिल्ह्यात या लसचा तुटवडा जाणवत असला तरी सिव्हील रुग्णालयात कोविशिल्ड लसचे एक हजार ६७० डोस शिल्लक आहेत. याशिवाय कोव्हँक्सीन लसचा दोन हजार ५३० डोसचा साठा आहे. यारुग्णालयात आजपर्यंत तीन हजार १९३ जणांनी कोव्हँक्सीनला पसंती दिली आहे. तर दहा हजार ५४७ जणांनी कोविशिल्डचे डोस घेतले आहेत, असे सिव्हिल रुग्णालयाचे आरएमओ डाँ. अशोक कांबळे यांनी लोकमतला सांगितले.