ठाणे : सोयीची शाळा मिळवण्यासाठी ठाणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांच्या बहुतांश शिक्षकांनी विविध कारणे दिली आहेत. त्यावर लक्ष केंद्रीत करून अन्यायग्रस्त शिक्षकांनी केलेल्या तक्रारींनंतर मोठा घोळ बाहेर आला. याप्रकरणी सतत पाठपुरावा सुरू ठेवला असता सोयीच्या बदलीसाठी दिशाभूल करणाºया शिक्षकांची संख्या ६८ वरून १५३ वर पोहोचली आहे. त्यापैकी वैद्यकीय दाखले जोडणाºयांमध्ये १०४ शिक्षकांचा समावेश आहे. त्यांच्या या दाखल्यांची फेरपडताळणी आता प्रशासनाकडून केली जात आहे. त्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्याचे सुतोवाच मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे यांनी केले आहे.
आॅनलाइन बदल्या होऊन दीर्घ काळ उलटला आहे. या बदल्यांमध्ये झालेला घोळ मात्र अजूनही मिटलेला नाही. सोयीच्या बदलीचा लाभ घेण्यासाठी बहुतांश शिक्षकांनी त्यांच्या सोयीनुसार कारणे देऊन जवळच्या शाळा मिळवल्या. पण त्यांच्या या पराक्रमाविरोधात अन्यायग्रस्त शिक्षकांनी तक्रारी करून या बदल्यांमधील घोळ बाहेर आणला. याबाबत ‘खोटी माहिती देणाºया शिक्षकांवरील कारवाईस विलंब’ या मथळ्याखाली लोकमतने २२ डिसेंबर रोजी वृत्त प्रसिध्द करून अन्यायग्रस्त शिक्षक न्यायालयात जाण्याच्या तयारीत असल्याचे उघड केले. या वृत्ताची दखल घेऊन जिल्हा परिषदेने या प्रकरणात गांभीर्याने लक्ष घालून या बदल्यांमधील १५३ शिक्षकांची यादी तयार केली आहे. त्यापैकी ४९ शिक्षकांच्या संवर्ग १ नुसार चौकशी सुरू केली आहे. याआधी त्याकडे प्रशासनाने लक्ष दिले नव्हते. आता १०४ शिक्षकांच्या वैद्यकीय दाखल्यांची फेरपडताळणी सुरू झाली आहे. संवर्ग १ नुसार पती-पत्नी एकत्रीकरणानुसार जवळच्या शाळेचा लाभ मिळतो. या सवलतीचा लाभ घेणाºयांमधील बहुतांश शिक्षकांनी पत्नी व स्वत:च्या शाळेचे अंतर चुकीच्या पध्दतीने दाखवून लाभ घेतल्याचा आरोप आहे. यामध्ये पत्नी व पती यांच्या शाळेमध्ये ३० किमी असल्यास जवळच्या शाळेचा लाभ घेणे सहज शक्य आहे. पण हे अंतर शिक्षकांनी त्यांच्या सोयीनुसार दाखवून सवलतीचा लाभ घेतला आहे. यामध्ये ४९ शिक्षकांचा समावेश दिसून येत आहे. त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.सर्वाधिक दाखले सिव्हिल रूग्णालयाचे : संबंधित शिक्षकांच्या नावांची यादी वैद्यकीय दाखले मिळवलेल्या ठाणे सिव्हिल रूग्णालयासह टाटा, जेजे, सायन आदींकडे पाठवण्यात आलेली आहे. यातील सर्वाधिक वैद्यकीय दाखले ठाणे सिव्हिल रूग्णालयातील असल्याचेही सांगितले जात आहे. या रूग्णालयांकडून अजून फेरपडताळणी अहवाल येण्यास विलंब झालेला आहे. मात्र लवकरच या वैद्यकीय दाखल्याची पडताळणी होईल. त्यानंतर संवर्ग एक व संवर्ग २ चा लाभ घेतलेल्या व त्यात बनावट वैद्यकीय दाखले जोडलेल्यांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार असल्याचे सुतोवाच जिल्हा परिषदेकडून केले जात आहे. संवर्ग तीन व चारचा लाभ घेतलेल्या शिक्षकांवर मात्र प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात येणार नसल्याचे सांगितले जात आहे.