सदानंद नाईक
उल्हासनगर : कॅम्प नं-१, सी ब्लॉक परिसरातील पाच मजली देवऋषी इमारतीचा पहिल्या मजल्याचा तळमजला स्लॅब कोसळून गिधवानी कुटुंबातील तिघे जण गंभीर जखमी झाले. सहायक आयुक्त गणेश शिंपी यांच्या नेतृत्वाखाली इमारत खाली करण्यात येत असून तब्बल २७ प्लॉटधारकांची राहण्याची व्यवस्था करण्यात येत आहे.
उल्हासनगरात इमारतीचे स्लॅब कोसळण्याचे सत्र सुरू असून कॅम्प नं-१, सी ब्लॉक साई बाबा मंदिर जवळील पाच मजल्याची देव ऋषी इमारतीचा पहिल्या मजल्याचा तळमजला स्लॅब कोसळवून हॉल मध्ये बसलेले राजू गिधवानी-५७, कांता गिधवानी व ८ वर्षाची जन्नत विक्की गिधवानी असे तीन जण जखमी झाले. इमारतीचा स्लॅब कोसळल्याची माहिती सहायक आयुक्त गणेश शिंपी यांना मिळाल्यावर, त्यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेऊन जखमीना रुग्णालयात पाठविले. तसेच सुरक्षेचा उपाय म्हणून इमारत खाली करण्यात येत आहे. तळमजल्यावर दुरुस्तीचे काम सुरू असल्याचे काही जणांचे म्हणणे होते. इमारती मध्ये एकून २७ प्लॉट असून त्यांची राहण्याची व्यवस्था महापालिका करीत असल्याची माहिती सहायक आयुक्त गणेश शिंपी यांनी दिली.
देवऋषी ही पाच मजल्याची इमारत १९९४ साली बांधण्यात आली असून इमारतीला स्ट्रॅक्टरल ऑडिटची नोटीस यापूर्वी महापालिकेने पाठविली होती. अशी माहिती उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी दिली. १९९४ ते ९८ दरम्यान बांधण्यात आलेल्या इमारतीचे सर्वेक्षण पालिकेने करून ५०५ इमारतींना एका महिन्यात स्ट्रॅक्टरल ऑडिट सादर करण्याच्या नोटिसा दिल्या होत्या. आतातरी नागरीकांनी मनावर घेऊन इमारतीचे स्ट्रॅक्टरल ऑडिट करण्याचे आवाहन यावेळी उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी केले. एका महिन्या पूर्वी मोहिनी पॅलेस व साईशक्ती इमारतीचे स्लॅब कोसळून १२ जणांचा बळी गेला. त्यानंतर महापालिकेने १० वर्ष जुन्या १५०० पेक्षा जास्त इमारतीला नोटिसा देऊन स्ट्रॅक्टरल ऑडिट सादर करण्यास सांगितले. तसेच त्यासाठी १५ जणांचे संरचनात्मक अभियंत्यांच्या पॅनेलची नियुक्ती करण्यात आली.
इमारतीधारकात भितीचे सावट
एका महिन्यांपूर्वी दोन इमारतीचे स्लॅब कोसळून १२ जणांचा बळी गेल्याने, जुन्या इमारतीधारकात भितीचे वातावरण आहे. संततधार पाऊस सुरू होताच इमारतीचा स्लॅब कोसळवून ३ जण जखमी झाले. याप्रकारने शहरात पुन्हा भितीचे सावट निर्माण झाले असून शासन व महापालिकेने अवैध व धोकादायक इमारती बाबत निर्णय घेण्याची मागणी होत आहे.