डोंबिवली: आरंभ प्रतिष्ठान हे ढोल ताशा व लाठी काठी पथक असून गेली पाच वर्षे डोंबिवलीसह राज्यात विविध ठिकाणी या संस्थेने त्यांची कला सादर केली आहे. राज्यात विविध स्पर्धांमध्ये जिंकून या संस्थेने डोंबिवलीचा ठसा उमटवल्यानंतर आता संस्थेने राज्याची सांस्कृतिक उपराजधानी असलेल्या सांस्कृतिक नगरित २७ व २८ जानेवारी रोजी ‘तालसंग्राम २०१८’ ही ढोलताशा स्पर्धा आयोजित केली आहे.त्या स्पर्धेसाठी डोंबिवलीसह मुंबई, नवी मुंबई, रायगड, ठाणे, कल्याण आदी ठिकाणांमधून १४ पथक सहभागी होत आहेत. या स्पर्धेत विजयी होणा-या पथकांसाठी प्रथम पारितोषिक रुपये १ लाख ५० हजार, द्वितिय पारितोषिक रुपये १ लाख, तृतिय क्रमांकासाठी ५० हजार रुपयांचे पारितोषिक संस्थेने जाहिर केले आहे. तसेच उत्कृष्ठ ढोल, ताशा, टोल, ध्वजधारीं यांसाठीही प्रत्येकी १० हजार रुपयांचे पारितोषिक जाहिर करण्यात आले आहे. उत्तेजनार्थ पारितोषिक, तसेच सहभागींसाठीही विशेष तरतूद करण्याचा संस्थेचा मानस आहे. विजेत्या पथकांना आकर्षक ट्रॉफी तसेच सन्मानपत्र, सहभागींना देखिल सहभाग प्रमाण पत्र देण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी पेंडसेनगरमधील क्रीडाभवन येथिल कानविंदे व्यायामशाळेच्या सभागृहात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बुधवारी दिली.डोंबिवली शहरातही सुमारे १६ पथक ढोल ताशा पथक आहेत. त्या सगळयांसाठी ‘महावादन’ करण्याचा संस्थेचा मानस असून २७ जानेवारी रोजी तो उपक्रम घेण्याचा प्रयत्न आहे. आरंभ प्रतिष्ठान संस्थेमार्फत भरवण्यात येणारी ही स्पर्धा डोंबिवलीत प्रथमच संपन्न होत असून ती यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र शासन सांस्कृतिक क्रिडा विभाग मंत्री विनोद तावडे, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, ‘शांतीरत्न’ प्रतिष्ठानचे संस्थापक, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राजू पाटील, आमदार जगन्नाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे, कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे महापौर राजेंद्र देवळेकर, सभागृह नेते, शिवसेना शहरप्रमुख राजेश मोरे, स्थायीचे सभापती राहुल दामले सहपोलिस उपायुक्त रवींद्र वाडेकर, डोंबिवली रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत वाहतूक नियंत्रण पोलिस अधिकारी गोविंद गंभीरे यांच्यासह विविध मान्यवरांचे सहकार्य मिळाले आहे. शहरातील सर्वपक्षिय नगरसेवक, काही वित्तसंस्था यांच्यासह क्रिडा भारती यांसारख्या सामाजिक संस्थेचे सहकार्य मोलाचे आहे. देशभर स्वच्छता अभियान सुरु असून कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेचेही ‘स्वच्छ सर्व्हेक्षण २०१८’ ही मोहीम सर्वत्र सुरु आहे, त्या मोहिमेंतर्गत स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी संस्था प्रयत्नशील आहे. शनिवारी ही स्पर्धा दुपारी ३ वाजता सुरु होणार असून रविावरी त्या स्पर्धेचा समारोप होणार आहे.