प्रज्ञा म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: शालेय विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीतून विज्ञान आणि तंत्रज्ञान अनुभवता यावेत. त्याचप्रमाणे विविध प्रयोग व प्रात्यक्षिकांच्या माध्यमांतून त्यांच्या कल्पनाशक्तीला चालना मिळावी, प्रोत्साहन मिळावे, तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचे विषय उदाहरणार्थ आर्टीफिशीयल इंटेलिजंट, रोबोटिक्स, आय.वो.टी, मशीन लर्निंग, थ्रीडी प्रिंटिंग, ड्रोन इत्यादी विद्यार्थ्यांना मातृभाषेतून सहज शिकता यावे या उद्देशाने चिल्ड्रेन टेक सेंटर-ठाणे आणि डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशन हाऊस ऑफ अब्दुल कलाम रामेश्वरम यांच्यामार्फत महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यात डॉ. अब्दुल कलाम इनोव्हेशन सेंटर उभारण्यात येणार आहेत. यासाठी तालुका स्तरावर शाळेची निवड केली जाणार असून काही नियमांच्या आधारे शाळेला आत्याधुनिक सेवा आणि सुविधांवर आधारित लॅब मोफत दिली जाणार आहे.
या उपक्रमाचा फायदा महाराष्ट्रातील १० ते १५ लाख शालेय विद्यार्थ्यांना होणार असून २०२४-२५ च्या शैक्षणिक वर्षात टप्याटप्प्याने हे काम पूर्ण केले जाणार आहे. चिल्ड्रेन टेक सेंट,ठाणेने विशेष टुडी आणि थ्रीडी ॲनिमेशन तयार केले असून विद्यार्थ्यांना मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेत प्रशिक्षण घेण्याच्या सुविधा उपलब्ध असणार आहे.
डॉ. अब्दुल कलाम इनोव्हेशन सेंटरचा प्रमुख उद्देश
* मुलांच्या कल्पनाशक्तीचा विकास करून त्यांच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणे.* मुलांचा तंत्रज्ञानाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलून तो अधिक प्रभावीपणे साकारणे.* विद्यार्थ्यांमध्ये सांघिक गुणांची भावना रुजवणे.* नाविन्यपूर्ण विचारशक्तीचा विकास करून त्याला चालना देणे.* तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विविध समस्यांचे समाधान कसे करता येईल याचा विचार करणे, नवीन विषय घेऊन त्यावर चर्चा करणे.* मुलांच्या मनातील कल्पना अस्तित्वात आणण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देणे.
डॉ. अब्दुल कलाम इनोव्हेशन सेंटरचे वैशिष्ट्य
* आंतराष्ट्रीय दर्जाच्या S.T.E.M. ( Science, Technology, Engineering, Math) कार्यपद्धतीवर आधारित अभ्यासक्रम* तंत्रज्ञानाच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलेली रचना.* ऑडिओ, व्हिडीओ आणि एनिमेशनच्या माध्यमातून प्रशिक्षण.* मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषांमधून प्रशिक्षणाची सुविधा.* प्रत्यक्ष कृतीतून कार्य करण्यावर भर.* मुलांच्या कल्पनाशक्तीचा विकास व्हावा म्हणून विशेष कृती.* विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील विज्ञान आणि रोबोटिक स्पर्धांसाठी मार्गदर्शन.* प्रत्येक सहभागी विद्यार्थ्यांना सहभागी होण्याचे प्रमाणपत्र.
अभ्यासक्रमाचे स्वरूप
डॉ. अब्दुल कलाम इनोव्हेशन सेंटरमधील अभ्यासक्रम हा प्रोजेक्ट बेस लर्निंग प्रणालीवर आधारित असून प्रत्येक सत्रात विद्यार्थ्यांना विविध प्रोजेक्ट करायला मिळतील. त्यातील काही प्रोजेक्ट विद्यार्थी घरी घेऊन जाऊ शकतील, तर काही प्रोजेक्ट प्रशिक्षणाचा भाग म्हणून असतील. प्रशिक्षण केंद्रातील संपूर्ण अभ्यासक्रम २० टक्के थेअरी आणि ८० प्रॅक्टिकल स्वरूपाचा असेल.