बोईसर : पालघर जिल्ह्यातील प्रतिष्ठीत व मानाचा समजला जाणारा डॉ. स.दा. (दादा) वर्तक जीवन गौरव पुरस्कार सफाळे येथील डॉ. पांडुरंग अमृते यांना त्यांच्या वैद्यकीय शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील बहुमोल योगदानाबद्दल ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या व सोनोपंत दांडेकर कॉलेजच्या विश्वस्त माणकताई पाटील यांच्या हस्ते देण्यात आला. वसईपासून बोर्डीपर्यंतच्या पंचक्रोशीत साठवर्षे वैद्यकीय सेवा देऊन हजारो रुग्णांचे प्राण डॉक्टर सदाशिव दादा वर्तक यांनी वैद्यकीय, शैक्षणिक व सामाजिकक्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल त्यांच्या स्मृती प्रीत्यर्थ डॉ. स.दा. (दादा) वर्तक जीवन गौरव पुरस्कार दिला जात असून या पुरस्कारा अंतर्गत रु. २५००० रोख स्मृतीचिन्ह व मानपत्र देण्यात येते. सफाळे येथे आयोजित केलेल्या या सोहळ्याला बोईसर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ.नंदकुमार वर्तक, यांच्या सह डॉ. विनायक परुळेकर, वा.ग.वर्तक, यशवंत घरत, संस्थेचे उपाध्यक्ष डॉ.सूर्यकांत संखे, पदाधिकारी चंद्रशेखर महंते अविनाश चुरी, मुख्याध्यापक डॅरल डिमेला आणि पंचक्रोशीतील सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. डॉ.अमृते हे खऱ्या अर्थाने पुरस्कारास पात्र असून जसे डॉ.दादांनी वैद्यकीय, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात भरीव कामे केले. तसेच काम सफाळ्यामध्ये डॉ. अमृते यांनी केले आहे. त्यांना प्रदान करण्यात आल्यामुळे या पुरस्काराची प्रतिष्ठा वाढली आहे असे सांगून त्यांनी बोईसर एज्युकेशन सोसायटीच्या कार्याचा गौरव केला. यावेळी अनेक मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले. तसेच वर्तक यांच्या कार्याचा व अमृते यांच्या योगदानाचाही गौरव केला.
अमृते यांना डॉ. वर्तक जीवनगौरव
By admin | Published: December 21, 2015 1:12 AM