- मुरलीधर भवार।लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी या कल्याणच्या. अमेरिकेत त्यांनी शिक्षण घेतले. आनंदीबार्इंनी पुण्यात अखेरचा श्वास घेतला. आनंदीबार्इंचे स्मारक उभारण्याबाबत कल्याण-डोंबिवली महापालिकेने अनास्था दाखवली असली, तरी कल्याणचे प्रा. विलास पेणकर यांनी दोन ते अडीच वर्षांच्या पाठपुराव्यानंतर आनंदीबाई यांची न्यूयॉर्कमधील स्मृतिशीला शोधून काढली व त्यांच्या स्मृतीस अभिवादन केले, तेव्हा त्यांचा ऊर अभिमानाने भरून आला, डोळे डबडबले. अलौकिक कर्तृत्वाच्या या महाराष्ट्रकन्येचा म्हणावा तसा गौरव झालेला नाही, अशी खंत प्रा. पेणकर यांनी व्यक्त केली.आनंदीबार्इंच्या जीवनकार्यावर अनेक पुस्तके लिहिली गेली. अलीकडेच एक चित्रपटही आला आहे. काही संस्था त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पुरस्कार देतात. जोशी यांचा खरा सन्मान हा अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये करण्यात आला आहे. जोशी यांची स्मृतिशीला आजही खूप चांगल्या स्थितीत न्यूयॉर्कमध्ये आहे. प्रा. पेणकर यांनी तिचा शोध घेतला, त्याची कहाणी रंजक आहे...प्रा. पेणकर हे मूळचे कल्याणचे. त्यांचा जन्म कल्याणमधील. शालेय शिक्षण घेतल्यावर त्यांनी पदवी शिक्षण घेतले. विविध कॉलेजमध्ये ते मानद प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. २० वर्षे प्राध्यापक म्हणून काम केल्यानंतर सध्या ते कल्याणच्या प्रतिथयश बँकेचे संचालक आहेत. पेणकर यांचा मुलगा सौरभ हा अमेरिकेत वास्तव्याला आहे. तो सीनिअर सॉफ्टवेअर इंजिनीअर आहे. दर तीन महिन्यांनी पेणकर मुलाकडे अमेरिकेत जातात. पेणकर यांना अर्थशास्त्राच्या अभ्यासाची आवड आहे. त्यांनी आता एक प्रकल्प हाती घेतला आहे. त्याचे नाव ‘भारताबाहेरील भारत’अर्थात ‘इंडिया आउट आॅफ इंडिया’ या प्रकल्पांतर्गत भारतीयांचे परदेशातील कार्य, विदेशांत भारतीय कोणता अभ्यास करत आहेत. पेणकर कल्याणचे आणि आनंदीबाई जोशी या देखील कल्याणच्या असल्याने या प्रकल्पांतर्गत त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा अभ्यास करणे सुरू केले. आनंदीबाई जोशी यांचे जीवन केवळ २२ वर्षांचे होते. त्यांच्या मृत्यूला १३० वर्षे उलटून गेली आहेत. जोशी या कर्मठ होत्या. आपला धर्म भ्रष्ट होईल, या कल्पनेने त्यांनी इतरत्र कुठे राहणे पसंत केले नाही. अमेरिकेतील मिसेस थेडोसिया कार्पेंटर यांच्या घरी त्या वास्तव्याला होत्या. अमेरिकेच्या पेनन्सिल्व्हा वुमन्स कॉलेजमधून जोशी यांनी वैद्यकीय क्षेत्रातील पदवी प्राप्त केली होती. कार्पेंटर यांच्या घरातील त्या एक सदस्य झाल्या होत्या. कार्पेंटर यांनीही आनंदीबार्इंना मानसकन्या मानले. त्यांची काळजी घेतली. त्यामुळे कार्पेंटर यांनी त्यांच्या मृत्यूपश्चात आनंदीबाई जोशींची स्मृतिशीला ही त्यांच्या स्मृतिशीलेशेजारी असावी, असा मानस व्यक्त केला होता. न्यूयार्कमध्ये पीकॅप्सी गावातील स्मशानभूमीत आनंदीबार्इंची स्मृतिशीला आहे. त्याठिकाणी मरणोत्तर दफनविधीसाठी अनेक लोक आधीच जागा घेऊन ठेवतात. त्याठिकाणी एक भले मोठे गार्डन आहे. त्यात कार्पेंटर यांच्या कुटुंंबातील जवळपास १२ जणांना दफन केले आहे. त्यांच्या कुटुंबातील सदस्यांप्रमाणे आनंदीबार्इंना तो मान देण्यात आला आहे. त्या परिसराला स्मशानभूमी म्हटले असले, तरी ते एक विस्तीर्ण पार्क आहे. जोशींची महती कार्पेंटर यांच्या कुटुंबातील प्रत्येकाला माहिती आहे. त्यामुळे कार्पेंटर यांच्या पश्चात त्यांची मुलगी, नात, पणती त्या स्मृती जपत आहेत. पेणकर, त्यांची पत्नी व मुलगा सौरभ आनंदीबाई यांच्या स्मृतिशीलेच्या ठिकाणी गेले. त्यांनी आनंदीबाई यांना अभिवादन केले. त्यावेळी कार्पेंटर यांचे वारस उपस्थित होते. त्या भेटीचा व्हिडीओ पेणकर यांनी सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. या स्मारकाला कदाचित अनेकांनी भेटी दिल्या असतील. कदाचित, त्यांची संख्या लहान असेल, पण त्यांच्या रांगेत आपण असल्याचा प्रा. पेणकर यांना अभिमान आहे. कल्याणमधील मंडळींना व विशेषकरून डॉक्टरांना तेथे घेऊन जाण्याकरिता डॉक्टर असलेल्या खा. श्रीकांत शिंदे यांनी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा पेणकर यांनी व्यक्त केली. आनंदीबाई जोशी या कल्याणच्या होत्या. त्यांचे कल्याणमधील स्मारक पूर्ण झालेले नाही. काही सामाजिक संस्था व समाजसेवक अनिल काकडे त्याकरिता प्रयत्नशील आहेत. प्रशासनातील अधिकारी व राजकीय इच्छाशक्तीच्या अभावापोटी कल्याणमधील स्मारक पूर्ण झालेले नाही.
डॉ. आनंदीबाई जोशी स्मारक : पहिल्या महिला डॉक्टर असूनही केला नाही सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2019 11:39 PM