ठाणे : ठाणे नगर वाचन मंदिराच्यावतीने डॉ.अरुणा टिळक यांचे ' आरोग्यदायी जीवनशैली ' विषयावर जाहीर व्याख्यान शनिवारी आयोजित केले होते. यावेळी व्यासपीठावर ठाणे नगर वाचन मंदिरचे अध्यक्ष पद्माकर शिरवाडकर उपस्थित होते.
स्वस्थ व्यक्तीचं स्वास्थ्य टिकवणे हे आयुर्वेदाचे काम आहे. त्यामुळे आपली जीवनशैली आयुर्वेदानुसार ठेवली तर आपण निरोगी राहू शकतो. मात्र आपल्या चुकीच्या जीवनपध्दती मुळे आपल्याला आजार जडतात. सकाळी ब्रम्ह मुहूर्तावर म्हणजे सूर्योदयापूर्वी दीड तास आधी उठणे अपेक्षित आहे. त्यानंतर दंतमंजन केल्यास ते दातांच्या तंदुरुस्ती साठी अतिशय उपयुक्त असते. त्यामुळे दातांची निगा चांगली राखली जाते आणि त्याचबरोबर पोटातील अग्नी प्रज्जवलित होण्यास मदत होत असल्याचे नमूद केले. अनेकदा आपल्याला सांगितले जाते सकाळी उठल्यावर 1 लिटर पाणी प्या ,मात्र आयुर्वेदानुसार असे करणे चुकीचे असून अधिक पाणी शरीरासाठी आणि आतड्यांसाठी हानिकारक आहे. पाणी पिणे हे आवश्यक असले तरी बदलत्या ऋतूनुसार पाणी पिण्याच्या सवयी बदलण्याचे आवाहन डॉ. टिळक यांनी केले. आज आपल्या चुकीच्या आहार आणि विहारच्या गोष्टींमुळे आपले आरोग्य धोक्यात आले आहे. तसेच आपण आजीबाईच्या बटवा आणि त्यातील उपचार पद्धती या विसरून गेली आहोत. त्यामुळे साधं पडसं झाले तरी आपण स्पेशालिस्ट डॉकटरकडे जात असल्याचे त्यांनी सांगितले.अनेकदा आपल्याला सांगितले जाते दिवसातून दोन दोन तासाने काहीतरी खा मात्र हे पूर्ण चुकीचे असून तुम्हाला खरंच भूक लागेल तेव्हा खा आणि तहान लागेल तेव्हाच पाणी प्या असा सल्ला डॉ. टिळक यांनी दिला.आपल्याकडे केवळ दिवाळी मध्ये अभ्यंगस्नान करण्याची परंपरा आहे . मात्र तरुणपिढीला ते देखील आवडत नाही असे नमूद करत रोज सर्वांनी अभ्यंगस्नान केले पाहिजे. असे मत डॉ. टिळक यांनी व्यक्त केले. अभ्यंगस्नान केल्यामुळे त्वचा मऊ होऊन तुकतुकीत राहत असल्याचे सांगितले.आजकाल जिम चं फॅड असल्यामुळे त्याकडे अधिक आकर्षण वाढत आहे. मात्र व्यायाम करताना सुर्यनमस्कार घालावेत. सूर्यनमस्कार सारखा उत्तम व्यायाम कोणता नाही असे त्यांनी नमूद केले. आज ज्या घरात ज्येष्ठ व्यक्ति आहेत. त्या आपल्याला नेहमी तंदुरुस्त दिसून येतात.कारण पूर्वीच्या काळी लोक दिवसातून फक्त दोनदा जेवत असत. त्यामुळे ते कायम निरोगी राहत असत.अनेकदा लोकांना जेवण झाल्यावर गोड खाण्याची सवय असते मात्र ही सवय आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक असून जेवणाची सुरुवात ही नेहमी गोड पदार्थ खाऊन करा असे आवाहन डॉ.टिळक यांनी करत सरतेशेवटी आपण आपली जीवनशैली सुधारली तर आपल्याला कोणताच आजार होणार नसल्याचे त्यांनी नमूद केले.