बदलापूर - डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताचे संविधान लिहिताना गौतम बुद्धांचे विचार उतरवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे संविधान जगातील सर्वोत्कृष्ट संविधान ठरले. गौतम बुद्धांनी दिलेला समता आणि बंधुताचा विचार संविधानात आल्यामुळेच आपले संविधान भक्कम झाल्याचे मत माजी मुख्यमंत्री आणि राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
बुद्ध पौर्णिमेनिमित्त बदलापुरात साकारण्यात आलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य स्मारकाचे उद्घाटन आणि या स्मारकाच्या ठिकाणी उंच पुतळा व अद्ययावत वाचनालय उभारण्याच्या कामाचे भूमिपूजन विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि कपिल पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले. आमदार किसन कथोरे यांच्या संकल्पनेतून हा भव्य स्मारक साकारण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या वेळेस देवेंद्र फडणवीस यांनी राजकीय टोलेबाजी बाजूला सारत गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार उपस्थितांसमोर मांडले.
नागपुरातील दीक्षाभूमीची हुबेहूब प्रतिकृती बदलापुरात साकारण्यात आल्याने या स्मारकासाठी आपली पूर्ण मदत मिळेल असे आश्वासन त्यांनी दिले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना सर्वान पर्यंत पोचवण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने सुरू असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. दुसरीकडे गौतम बुद्ध यांचा धम्म हा आशिया खंडात बहुसंख्य राष्ट्रांनी स्वीकारला हे अभिमानास्पद म्हणावे लागेल. प्रत्येक धर्माचा विस्तार हा रक्तपात करून झाला आहे .मात्र बुद्धांचा धम्म हा शांततामय मार्गातूनच पसरला आहे. शांततेच्या मार्गाने धम्माचा प्रसार करीत असताना आशिया खंडातील बहुसंख्य राष्ट्राने बुद्धांचे विचार आत्मसात केले आणि त्या आधारेच आपल्या राष्ट्राचा विकास केल्याचे मत फडणवीस यांनी व्यक्त केले.
दरम्यान केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी बदलापूरच्या स्मारकासाठी केंद्राकडून निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे आश्वासन दिले. तसेच आंबेडकर यांच्या पुतळ्याला भोवती सुशोभिकरण करण्यासाठी 40 लाखांचा निधी तत्काळ देण्याचे आश्वासन दिले. यावेळी आमदार किसन कथोरे यांनी या स्मारकाबाबत यांचे मनोगत व्यक्त केले तर खासदार कपिल पाटील यांनी देखील आपले मत व्यक्त केले. या कार्यक्रमाला आमदार निरंजन डावखरे, माजी नगराध्यक्ष राजन घोरपडे, संभाजी शिंदे, शरद तेली, किरण भोईर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.