लाेकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: महापालिका मुख्य वैद्यकीय अधिकारी पदावर डॉ. चेतना नितील के यांची नियुक्ती राज्य सरकारने केली आहे. सोमवारी त्या पदभार स्विकारणार असल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली. तत्कालीन मुख्य वैद्यकीय अधिकारी डाॅ. योगेश शर्मा यांच्यावर निलंबनाची कारवाई झाल्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून हे पद रिक्त होते.
ठाणे महापालिकेचे तत्कालीन मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. आर. टी. केंद्रे हे पाच वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झाले. तेव्हापासून या पदावर आतापर्यंत सहा ते सात वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नेमणुका करण्यात आल्या. यामध्ये पालिका सेवेतील आणि राज्य सरकारकडून प्रतिनियुक्तीवर पाठविलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचा समावेश होता. यातील काहींनी स्वतःहून पदभार सोडला. तर डॉ. राजीव मुरुडकर यांना लाचखोरीमुळे पदभार सोडावा लागला. तसेच रुग्णालयातील डाॅक्टरांच्या वसतीगृहाच्या दुरावस्थेस जबाबदार धरून महापालिकेचे मुख्य आरोग्य अधिकारी तसेच कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाचे मुख्य अधिष्ठता डाॅ. शर्मा आणि उप अधिष्ठाता डॉ. सुचितकुमार कामखेडकर यांना दोन महिन्यांपूर्वी निलंबित केले.
मुख्य आरोग्य अधिकारी या पदाचा प्रभारी पदभार डॉ. राकेश बारोट यांच्याकडे साेपविलेला हाेता. या पदावर राज्य सरकारने मुंबई महापालिकेतील वरीष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. चेतना यांची नियुक्ती केली आहे. एक वर्षाच्या कालावधीसाठी त्यांची ही प्रतिनियुक्ती झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.