बदलापूर : बदलापूरमधील सोनिवली येथे उभारण्यात येणारे आंबेडकर स्मारक हे अनेक वर्षांपासून निधीअभावी रखडले होते. अखेर, या स्मारकाचे काम पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारने सात कोटी ९३ लाखांचा निधी मंजूर केला आहे.सोनिवली येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक उभारण्याचे काम हाती घेतले होते. या स्मारकासाठी सरकारकडून निधीची पूर्तत: करण्यात आली होती. मात्र, स्मारक भव्य असावे म्हणून आराखड्यात काही बदलही केले. त्यामुळे प्रस्तावित निधीमध्ये या स्मारकाचे काम पूर्ण झाले नाही. स्मारकाचा आराखडा वाढल्याने अतिरिक्त निधीची गरज होती. मात्र, सरकारने या कामासाठी अतिरिक्त निधी न दिल्याने हे स्मारक अर्धवट अवस्थेत होते. त्यामुळे या स्मारकासाठी निधीची तरतूद व्हावी, यासाठी प्रयत्न सुरू होते. अखेर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त सरकारने या स्मारकासाठी निधीची तरतूद करण्यास हिरवा कंदील दाखवला. त्यानुसार, आठ कोटींचा प्रस्ताव सरकारकडे पाठवला. या कामाची तांत्रिक मंजुरी घेऊन हा प्रस्ताव सात कोटी ९३ लाखांचा झाला असून त्यासाठी सरकारने पूर्ण निधी देणे मान्य केले आहे. सरकारने काढलेल्या परिपत्रकात या स्मारकासाठी निधीची तरतूद केल्याचे नमूद केले आहे.या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यावर लागलीच काम सुरू करण्यात येणार आहे. या आठ कोटींच्या निधीचा वापर करून स्मारकाचे उर्वरित बांधकाम पूर्ण केले जाणार आहे. परिसराचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. तसेच आवश्यक त्या सुविधा पुरवण्यात येणार आहे.स्मारकाचे काम थांबल्याची खंत सतत होती. त्यामुळेच हे काम पूर्णत्वास यावे, याच हेतूने सरकारकडे प्रस्ताव पाठवला होता. सरकारनेही स्मारकासाठी आवश्यक तो निधी दिल्याने आता या स्मारकाचे काम पूर्ण करण्यास मदत होणार आहे. बदलापूरमधील आंबेडकरी नागरिकांना दिलेले आश्वासन पूर्ण होणार असल्याचे समाधान आहे.- किसन कथोरे, आमदार
डॉ. आंबेडकर स्मारक होणार पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 01, 2019 11:59 PM