भिवंडी : भाजपच्या जनआशीर्वाद यात्रेदरम्यान तालुक्यातील भोईरगाव येथे उभारलेल्या महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रवेशद्वाराचे लोकार्पण मान्यवरांच्या उपस्थितीत गुरुवारी (दि. १९) उत्साहात पार पडले. कुकसे-भोईरगाव ग्रुप ग्रामपंचायतीच्या वतीने उभारलेल्या डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रवेशद्वाराचे लोकार्पण व एमएमआरडीएच्या माध्यमातून ११ कोटी खर्चून तयार केलेल्या भोईरगाव-सवाद रस्त्याच्या कोनशिलेचे अनावरण, गरिबांना धान्यवाटप केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांची ठाणे जिल्ह्यातून मंत्रिपदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी नागरिकांचे आशीर्वाद घेण्यासाठी जनआशीर्वाद यात्रेचे आयोजन केले आहे. मुरबाड, शहापूर तालुक्यांतून यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यानंतर ही यात्रा गुरुवारी भिवंडी तालुक्यात आली. ठाणे जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती श्रेया श्रीकांत गायकर, भाजयुमोचे माजी जिल्हाध्यक्ष व पडघा सोसायटीचे सभापती श्रीकांत गायकर यांच्या मार्गदर्शनाखाली भोईरगाव बसस्टॉपजवळ बँड, तुतारी, ढोलताशा व तारपा नृत्य सादर करून जनआशीर्वाद यात्रेचे भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी आमदार किसन कथोरे, जिल्हा परिषदेचे सदस्य दयानंद पाटील, पंचायत समितीचे सदस्य गुरुनाथ जाधव, सरपंच कमला पाटील, माजी सरपंच भरत पाटील, उपसरपंच नीलम भोईर, अभिषेक नागवेकर, ग्रामसेवक भास्कर घुडे, उद्योगपती पद्माकर भोईर, संतोष भोईर, भाजप जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय पाटोळे, पांडुरंग पाटील, आदींसह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
पाटील यांचे ठिकठिकाणी स्वागत
गुरुवारी सायंकाळी कपिल पाटील मंत्रिपदाच्या ४४ दिवसांनंतर भिवंडीत दाखल झाले. मुंबई-नाशिक महामार्गावर वडपे गावाच्या हद्दीत त्यांचे भाजप कार्यकर्त्यांनी जाेरदार स्वागत केले. रांजणोली नाका येथे स्वागत पार पडल्यानंतर त्यांनी साईबाबा मंदिरात साईंचे दर्शन घेऊन नवी वस्ती, धर्मवीर चौक, जुनी महापालिका येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करून वंजारपट्टी नाकामार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला अभिवादन केले. त्यानंतर टिळक चौक, मंडई, गौरी पाडा, धामणकर नाका, कामतघर, ताडाळीमार्गे अंजूरफाटा अशी जनआशीर्वाद यात्रा मार्गस्थ झाली. यात्रेदरम्यान पाेलिसांचा चाेख बंदाेबस्त हाेता.