अंबरनाथ : अंबरनाथ विधानसभा मतदारसंघात चुरशीची वाटणारी लढत एकतर्फी झाली. शिवसेनेचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी काँग्रेसचे उमेदवार रोहित साळवे यांचा तब्बल २९ हजार ९६ मतांच्या फरकाने पराभव केला. या निवडणुकीत मनसेला मागे सारत वंचित बहुजन आघाडीचे धनंजय सुर्वे यांनीही चांगला प्रभाव टाकत १६ हजारांहून अधिक मते घेतली. तर, मनसेचे उमेदवार सुमेध भवार हे चौथ्या क्रमांकावर राहिले.
अंबरनाथ मतदारसंघात शिवसेना आणि भाजप युतीमुळे ही निवडणूक एकतर्फी होईल, अशी आशा होती. मात्र, काँग्रेसकडून आलेले उमेदवार साळवे यांनी किणीकर यांच्यापुढे आव्हान निर्माण केले होते. काँग्रेसच्या उमेदवाराने अंबरनाथसह उल्हासनगरमध्येही वातावरणनिर्मिती केल्याने ही निवडणूक चुरशीची होईल, अशी परिस्थिती निर्माण झाली होती.
मात्र, निकालाच्या दिवशी अंबरनाथच्या मतदाराने शिवसेनेचे किणीकर यांनाच पसंती दिल्याचे स्पष्ट झाले. २२ फेऱ्यांमध्ये झालेल्या मतमोजणीत किणीकर यांना ५९ हजार ७४१ मते मिळाली, तर साळवे यांना ३० हजार ६४५ मते मिळाली. तिसºया क्रमांकावर राहिलेले धनंजय सुर्वे यांना १६ हजार १९२ मते मिळाली. तर, मनसेचे सुमेध भवार हे १३ हजार ५९३ मते घेऊन चौथ्या क्रमांकावर राहिले.
या निकालानंतर किणीकर यांच्याविरोधात निवडणूक लढविणारे साळवे वगळता सर्वच उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. किणीकर हे मतमोजणीवेळी पहिल्या फेरीपासूनच आघाडीवर होते. त्यांची आघाडी ही बाराव्या फेरीनंतर वेगात पुढे सरकली. किणीकर यांनी साळवे यांचा तब्बल २९ हजार ९६ मतांनी पराभव केला आहे. गेल्या दोन निवडणुकांच्या तुलनेत हा विजय किणीकरांसाठी विक्रमी ठरला आहे.
अंबरनाथ : गेल्या विधानसभेच्या तुलनेत यंदाच्या निवडणुकीतील विजय हा बालाजी किणीकरांसाठी दिलासादायक होता. गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत किणीकर यांना अल्प मताधिक्याने विजय मिळाला होता. मात्र यंदाचा विजय हा त्यांच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा विजय ठरला आहे. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत किणीकर यांचा २० हजार मताधिक्याने विजय झाला होता. प
हिल्याच प्रयत्नात त्यांचा विक्रमी विजय झाला. त्या वेळेस राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्त महेश तपासे यांचा पराभव केला होता. या विजयानंतर किणीकर यांना प्रथमच आमदार होण्याची संधी मिळाली. पहिल्या टप्प्यात किणीकर यांना राज्य आणि राज्याचा कारभार शिकण्यात वेळ गेला. त्यामुळे पाच वर्षात विकासकामे लांबणीवर पडली होती. त्यानंतर झालेल्या २०१४ च्या निवडणुकीत किणीकर यांना भाजपचे उमेदवार राजेश वानखेडे यांच्या विरोधात निवडणूक लढविण्याची वेळ आली. मात्र ती निवडणूक किणीकर यांना चटका देऊन गेली.
शेवटच्या फेरीत मिळालेल्या मताधिक्यावर किणीकर यांचा २००० मतांनी विजय झाला. मात्र या विजयानंतर विकास कामांवर भर दिल्याने आणि शहरातील काही महत्वाचे विषय मार्गी लावल्याने त्यांना २०१९ ची निवडणूक सोपी गेली. मात्र काँग्रेसला कमी न लेखता त्यांनी आपल्या प्रचाराची धार कायम ठेवली.
रॅलीला परवानगी नसल्याने शुकशुकाटअंबरनाथ : अंबरनाथ विधानसभा मतदारसंघात हॅट्ट्रिक करणारे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या विजयानंतर जल्लोष करण्याची संधी हवी तशी मिळाली नाही. किणीकर यांचा विजय झाल्यावर पालिका कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. त्यानंतर, सर्व कार्यकर्ते शिवाजी चौकात शिवसेना शाखेच्या दिशेने निघाले. मात्र, रॅलीला परवानगी नसल्याने रॅलीचा उत्साह विजयानंतर दिसला नाही.
मतमोजणीसाठी सकाळपासून केंद्राबाहेर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. महात्मा गांधी विद्यालयात मतमोजणी असल्याने समोरील राज्य महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. निकालाचा कल जसजसा शिवसेनेच्या बाजूने लागू लागला, तसतशी कार्यकर्त्यांची जमवाजमव सुरू झाली. काही शिवाजी चौकात तर काही पालिकेत गर्दी करून होते. पहिल्या दोन फेरीत आघाडी मिळाल्यावर किणीकर यांचा उत्साह वाढला होता.
तर, काँग्रेसचे उमेदवार रोहित साळवे हे मतदान केंद्र परिसरात फिरकलेही नाहीत. किणीकर यांची आघाडी कायम राहिल्याने इतर उमेदवारांनीही काढता पाय घेतला. विजय निश्चित झाल्यावर ते शाळेच्या दिशेने कार्यकर्त्यांसह गेले. मात्र, पोलिसांनी रॅली आणि जल्लोषावरच निर्बंध घातल्याने फटाके वाजविण्याव्यतिरिक्त काहीच करता आले नाही.