ठाणे : ठाण्यातील ‘आपला दवाखाना’ योजनेच्या माध्यमातून मानसिक त्रासाला सामोरे जात असलेल्या वन रुपी क्लिनिकच्या डॉ. राहुल घुले यांनी झोपेच्या ३० गोळ्या खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती बुधवारी समोर आली. सध्या आपली प्रकृती स्थिर असून, रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
काही दिवसांपासून राजकीय एजंट पैशांची मागणी करीत असून, आपल्या जिवाला धोका असल्याचेही त्यांनी सांगितले. आत्महत्या करावी अशी परिस्थिती निर्माण झाल्याचेही ट्वीट त्यांनी केल्याने खळबळ उडाली आहे.ठाणे महापालिका हद्दीत स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने आपला दवाखाना सुरू केला आहे. हे काम मेडिंगो या कंपनीला दिले होते; परंतु हे काम झेपत नसल्याने त्यांनी वन रुपी क्लिनिकचे राहुल घुले यांच्या मदतीने ठाण्यात २५ ठिकाणी आपला दवाखाना सुरू केला.
मात्र, सहा महिने उलटूनही केलेल्या कामाचे बिल अदा न झाल्याने काही दिवसांपूर्वीच घुले यांनी दवाखान्याचे शटर डाऊन करून ट्वीटद्वारे थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मदतीची मागणी केली होती. आता २२ जून रोजी रात्री त्यांनी पुन्हा ट्वीट करून राजकीय एजंट आपल्याकडून वारंवार पैशाची मागणी करीत असल्याचे सांगितले, तसेच दुसऱ्या ट्वीटमध्ये त्यांनी काही एजंटची नावेदेखील जाहीर केली. त्यामुळे या ट्वीटमुळे चांगलाच गदारोळ झाला होता.
...ते ट्विट डिलिट केले
आपल्याला राजकीय एजंटपासून धोका असल्याचे सांगून येत्या काळात अशा राजकीय एजंटची नावे जाहीर करीन असेही ट्वीट केले होते; परंतु काही वेळाने कौटुंबिक कारणास्तव आपण ट्वीट डिलिट केले असल्याचे डॉ. घुले यांनी ‘लोकमत’ला सांगितले.