अजित मांडके, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : ठाणे लोकसभेत आता शिंदे सेना, उध्दव सेना यांच्या पाठोपाठ वंचितने देखील उडी घेतली आहे. वंचित बहुजन विकास आघाडीकडून ठाणे महापालिकेच्या सेवेतून निवृत्त झालेले माजी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. आर. टी. केंद्रे यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. शुक्रवारी त्यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यामुळे आता या निवडणुकीची रंगत आणखी वाढणार असल्याची चिन्हे आहेत. वंचितची या मतदार संघात फारसा प्रभाव नसला तरी मागील निवडणुकीचा विचार केल्यास वंचित ४० ते ४५ हजार मते या मतदार संघात मिळवू शकते अशी शक्यता आहे.
ठाणे लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीत दिवसेंदिवस काही ना काही घटना समोर येत आहे. या मतदारसंघावरून भाजप आणि शिंदे सेनेमध्ये चांगलीच रस्सीखेच पाहण्यास मिळाली. त्यातच महाविकास आघाडीने उमेदवार जाहीर करून प्रचार सुरू करून आघाडी घेतली. तर उमेदवार मिळत नसेल तर मला बिनविरोध निवडून दयावे असे उद्गार काढत उमेदवार राजन विचारे यांनी डिवचण्याचे कामही महायुतीला केले. मात्र शेवटच्या क्षणी शिंदे सेनेकडून नरेश म्हस्के यांच्या नावाची घोषणा झाली. त्यामुळे शिंदे सेना विरुध्द उध्दव सेना अशी लढत होणार हे निश्चित झाले आहे.
मात्र असे असतांना आता वंचित बहुजन आघाडीने देखील या निवडणुकीत उडी घेतली आहे. वंचित बहुजन विकास आघाडीकडून ठाणे महापालिकेतील सेवा निवृत्त अधिकारी डॉ. आर. टी. केंद्रे यांच्या नावाची घोषणा केली. त्यानंतर केंद्रे यांनी देखील शुक्रवारी अखेरच्या क्षणी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यापूर्वी केंद्रे हे महापालिकेत लोकप्रतिनिधींच्या प्रश्नांना उत्तरे देत होते. महापालिकेत घनकचरा विभाग त्यानंतर मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी म्हणून त्यांची कारर्कीद नेहमीच चर्चेत राहिली होती. दुसरीकडे मागील लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने या मतदार संघातून ४७ हजार ४३२ मते मिळविली होती. परंतु आता शिवसेनेचे दोन तुकडे झाले असल्याने वंचितची कदाचित हीच मते निर्णायक ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यात येत्या काही दिवसात वंचितचे नेते डॉ. प्रकाश आंबेडकर हे सभा देखील घेणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.