डोंबिवली : केडीएमसीच्या डोंबिवली विभागीय कार्यालयाच्या बाहेर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १० फुटी पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येणार आहे. हा पुतळा सोमवारी रात्री उशिरा मुंबईहून डोंबिवलीत आणण्यात आला. शनिवारी, १४ एप्रिलला बाबासाहेबांची जयंती असून, त्याच्या पूर्वसंध्येला शुक्रवारी, १३ तारखेला पुतळ्याचे अनावरण केले जाणार आहे. दरम्यान, अद्यापपर्यंत ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाची परवानगी मिळालेली नाही. त्याशिवाय अनावरण शक्य नसल्याने परवानगी लवकरात लवकर मिळावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.कल्याण शहरात डॉ. आंबेडकर यांचा पुर्णाकृती पुतळा आहे, पण डोंबिवली शहरात तो नव्हता. त्यामुळे डोंबिवलीतही बाबासाहेबांचा असा पुतळा उभारण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत होती. मात्र, बाबासाहेबांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याची १५ ते २० वर्षांपासूनची मागणी आता प्रत्यक्षात साकार होणार आहे. शिल्पकार स्वप्निल कदम यांनी साकारलेला पुतळा सोमवारी रात्री उशिरा डोंबिवलीत आणण्यात आला. या वेळी महापौर राजेंद्र देवळेकर, सभागृहनेते राजेश मोरे आणि शिवसेना गटनेते रमेश जाधव हे जातीने उपस्थित होते.पूर्वेतील इंदिरा गांधी चौकात केडीएमसीच्या विभागीय कार्यालयाच्या वास्तूलगत हा पुतळा बसवण्यात आला आहे. त्यासाठी तेथे १२ फूट उंच चबुतरा बांधण्यात आला आहे. त्याच्यावर बाबासाहेबांचा पुतळा ठेवण्याचे काम मध्यरात्रीपर्यंत सुरू होते. शुक्रवारी सायंकाळी या पुतळ्याचे अनावरण केले जाणार आहे. या वेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले, ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती महापौर राजेंद्र देवळेकर यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही आमंत्रित केले जाणार असल्याचे देवळेकर यांनी सांगितले.कल्याणचे तहसीलदार अमित सानप यांनी रविवारी जेथे पुतळा उभारण्यात येणार आहे, त्या जागेची पाहणी केली. सानप यांनी सोमवारी या बाबतचा अहवाल ठाणे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांना सादर केला आहे. परंतु, अद्यापपर्यंत परवानगी मिळालेली नाही. परवानगी मिळाल्यानंतरच शुक्रवारी पुतळ््याचे अनावरण होणार की नाही, याबाबतचे चित्र स्पष्ट होणार आहे.>आयुक्तांकडून स्मारकाची पाहणीआयुक्त गोविंद बोडके यांनी मंगळवारी सकाळी ११ वाजता स्मारकाला भेट देऊन पाहणी केली. या वेळी त्यांच्यासोबत शहरअभियंता प्रमोद कुलकर्णी, उपायुक्त सुरेश पवार, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुभाष पाटील, वाहतूक डोंबिवली शहर शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गोविंद गंभीरे होते. स्मारक लोकार्पण कार्यक्रमाच्या वेळी वाहतुकीचे काय नियोजन केले आहे, अशी विचारणा गंभीरे यांना आयुक्तांनी केली. त्यावर रिक्षा आणि बस स्थानक त्यादिवशी अन्यत्र हलवण्यात येईल आणि वाहतूकही तेथूनच मार्गस्थ केली जाईल, असे गंभीरे यांनी सांगितले.>पूर्वेकडील स्मारकाचे भूमिपूजनकल्याण पूर्वेकडील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या कामाचे भूमिपूजन बाबासाहेबांच्या जयंतीदिनी १४ एप्रिलला करण्याचे ठरवले आहे. आमदार गणपत गायकवाड यांच्या आमदार निधीतून हे स्मारक साकारण्यात येणार आहे, पण या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता मिळालेली नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या कार्यक्रमासाठी आमंत्रित केले जाणार असल्याची माहिती गायकवाड यांनी दिली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा डोंबिवलीत दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 3:18 AM