ठाणे : आज अनेक प्रकारचे साहित्य आपल्याला संदर्भासाठी उपलब्ध आहे. मात्र त्याकाळातही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भाषेवर आणि विशेषत: इंग्रजी भाषेवर असलेले प्रभुत्व आजच्या पिढीला शिकण्यासारखे आहे. त्यामुळेच खऱ्या अर्थाने शिक्षणाचे महत्व डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी अधोरेखीत केले असे प्रतिपादन ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी केले.
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनी बुधवारी ठाणे महापालिकेच्या पत्रकार कक्षात ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्यावतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. याप्रसंगी पोलीस अधिक्षक देशमाने बोलत होते. ते पुढे म्हणाले की, शिक्षणाचे महत्त्व काय असते हे त्याकाळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ज्ञात झाले होते. त्यामुळे ते शिक्षणाचे महत्व अधोरेखित करणारे खरे महानायक आहेत. यावेळी देशमाने यांनी फर्ग्युसन महाविद्यालयातील एक आठवण सांगितली. या महाविद्यालयातील लायब्ररीमध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा एक फोटो होता. त्याच्या खाली त्यांच्या डिग्री लिहिल्या होत्या. या डिग्री मोजल्या तेव्हा त्या २८ पेक्षा अधिक असल्याचे निदर्शनास आले.
आपण सगळ्यांनी डोळे उघडे ठेऊन पाहिले तर त्यांनी लिहिलेले सुविचार हे सागरावरील दिपस्तंभासारखी आहेत असेही ते शेवटी म्हणाले. अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे म्हणाले की, समाजात आणि प्रशासनामध्ये समानता किंबहुना समान संधी मिळाली आहे. त्याचे प्रमुख योगदान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आहे तर प्रत्येकाला प्रगतीसाठी समान संधी मिळण्याचे श्रेय देखील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे आहे. त्यांच्या शिकवणीचे अनुकरण करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. विशेष सरकारी वकील ॲड. रेखा हिरवाळे म्हणाल्या की, महिलांचा विकास झाला तर संपूर्ण देशाचा विकास होईल त्यामुळे महिलांना संविधानाच्या माध्यमातून डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जे अधिकार दिले त्याने खऱ्या अर्थाने महिला देशाच्या विकासात हातभार लावू शकल्या. यावेळी महापालिका उपायुक्त उमेश बिरारी, पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे व इतर पत्रकार उपस्थित होते.