डोंबिवली : मागासवर्गीयांवर आणि अल्पसंख्याकांवर अॅट्रॉसिटी, हिंसाचाराचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. डॉ. पायल तडवी यांनीही अॅट्रॉसिटी, रॅगिंग आणि जातीय छळवणुक ीमुळे आत्महत्या केली. त्याच्या निषेधार्थ कल्याण शहरातून विविध पक्ष, संघटना मंगळवारी हुंकार रॅली काढणार आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानातून सायंकाळी ४ वाजता ही रॅली निघेल. शिवाजी चौक येथे तिचा समारोप होईल. तेथे श्रद्धांजली सभा होणार आहे. डॉ. पायल यांना न्याय मिळावा, यासाठी एकमुखी संदेश देण्यात येणार आहे. या रॅलीत शिक्षण, आरोग्य अधिकार मंच, भारतीय कम्युनिस्ट पक्ष (सीपीआय), वंचित बहुजन आघाडी, काँग्रेस (आय), राष्ट्रवादी काँग्रेस, आॅल इंडिया स्टुडंट फेडरेशन (एआयएसएफ), समता संघर्ष समिती, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, आरपीआय (सेक्युलर), संभाजी ब्रिगेड, आम आदमी पक्ष (आप), पंचशील मेडिकल असोसिएशन, रिव्होल्युशनरी मार्क्सिस्ट पार्टी आॅफ इंडिया, शेतकरी कामगार पक्ष, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक उत्सव समिती या संस्थांचा सहभाग असणार आहे.
शैक्षणिक संस्थेमध्ये जातीय छळवणुकीची बळी ठरलेल्या डॉ. पायल तडवी यांची आत्महत्या ही मनुवादी मनोवृत्तीचे आणि बाजारू शिक्षणव्यवस्थेचे फलित आहे. नायर रुग्णालयाशी संलग्न टोपीवाला महाविद्यालयातील वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमात आदिवासी मुस्लिम तडवी समाजातील या विद्यार्थिनीला जातीय छळवणुकीला कंटाळून आत्महत्येस प्रवृत्त केले होते. ही सार्वभौम, धर्मनिरपेक्ष, समाजवादी गणराज्यातील काळिमा फासणारी घटना आहे.
काही वर्षांपूर्वी हैदराबाद युनिव्हर्सिटीतील पीएच.डी.चा विद्यार्थी रोहित वेमुला यलाही जातीय छळवादाने आत्महत्येस प्रवृत्त केले होते. आरक्षित जागेवर प्रवेश मिळवलेल्या अनेक होतकरू आणि सक्षम मागासवर्गीय विद्यार्थ्यांना अत्यंत हीन दर्जाची व अपमानास्पद वागणूक आजही दिली जात आहे. डॉ. तडवी यांना न्याय मिळावा, यासाठी ही रॅली काढण्यात येणार आहे, अशी माहिती शिक्षण आरोग्य अधिकार मंचाचे अॅड. नितीन धुळे यांनी दिली.