नितिन पंडीत
भिवंडी - भिवंडी महापालिकेच्या मुख्यालयाच्या प्रांगणात. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पंधरा फूट उंचीच्या पुतळ्याचे अनावरण शुक्रवारी केंद्रीय पंचायतराज मंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, भिवंडी पश्चिमचे आमदार महेश चौगुले, आरपीआय एकतावादीचे राष्ट्रीय अध्यक्ष नानासाहेब इंदिसे, मनपा आयुक्त सुधाकर देशमुख यांच्यासह मनपा अधिकारी कर्मचारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा महापालिकेत उभारावा अशी भिवंडीकरांची मागणी होती. त्यानुसार पालिकेने पूर्णाकृती पुतळा उभारावा असा ठराव घेऊन त्यासंबंधी शासनाच्या सर्व संबंधित विभागाच्या परवानग्या घेण्यात आल्या असून जवळपास ४६ लाख रुपये खर्च करून भव्य पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. या पुतळ्याची उंची १५ फूट असून १२५० किलो एवढे वजन आणि डार्क ब्राऊन ऑक्सीडाईझ करण्यात आलेल्या या पुतळ्याचे १०० वर्षे एवढे आयुष्यमान असल्याची माहिती मनपा आयुक्त सुधाकर देशमुख यांनी कार्यक्रमाच्या प्रस्तावनेत दिली. भिवंडीतील अनधिकृत व अतिधोकादायक इमारतींचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावावा यासाठी भिवंडीत क्लस्टर योजना राबविणे गरजेचे असून तसा प्रस्ताव मनपा आयुक्तांनी राज्य शासनाकडे पाठवावा अशी सूचना यावेळी पालकमंत्री तथा नगरविकास मंत्री शिंदे यांनी मनपा आयुक्तांना केली. समृद्धी महामार्गामुळे भिवंडीतील वाहतूक कोंडी सुटणार असल्याची आशाही शिंदेंनी यावेळी व्यक्त केली. तर डॉ. बाबासाहेबांनी राज्यघटनेच्या माध्यमातून देशातील सर्व समाजाच्या नागरिकांचा उद्धार केला, तशीच सामाजिक जाणिव केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी लक्षात घेऊन ओबीसींच्या आरक्षणाचा प्रश्न राजकीय पक्ष बाजूला सारुन करावा, अशी सूचना गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली.
त्यास प्रतिउत्तर म्हणून बाबसाहेब हे समानतेचा संदेश देणारे नेते होते, जाती पातीचे राजकारण दूर ठेऊन त्यांनी सर्व कार्यामध्ये समानता ठेवत आपले कार्य केले. ठाण्यातील मंत्र्यांनी ठाणे शहराचा जसा विकास केला तसा भिवंडी शहराचा विकास झालेला नाही. त्यामुळे शहर विकासाबाबत तशीच समानता भिवंडी शहराच्या विकासाबाबत व्हावी कारण भिवंडी आणि ठाणे या शहरांमध्ये विकासाबाबत मोठी तफावत आहे, असे प्रतिउत्तर केंद्रीय पंचायतराज मंत्री कपिल पाटील यांनी आपल्या भाषणातून मंत्री आव्हाड यांना दिले. दरम्यान, कार्यक्रमाच्या शेवटी पुतळ्याचे वास्तू विशारद जीवन धिवरे शिल्पकार स्वप्नील कदम व कंत्राटदार अशा तिघांचा सन्मान यावेळी उपस्थित मंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन मानसी राजे यांनी केले तर आभार प्रदर्शन मनपा उपायुक्त दीपक झिंजाड यांनी व्यक्त केले.