कल्याण : शहराला आंतरराष्ट्रीय ओळख मिळवून देणाऱ्या भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांच्या प्रस्तावित स्मारकाबाबत केडीएमसी प्रशासनाची अनास्था कायम आहे. आनंदीबाई यांच्या कर्तृत्वाचा जीवनप्रवास उलगडणारा चित्रपट आला असतानाही तीन वर्षांपूर्वी स्मारकाचे भूमिपूजन होऊनही ते उभारण्यासाठी अद्यापपर्यंत मुहूर्त मिळालेला नाही.
प्रतिकूल परिस्थितीत अपार कष्ट आणि दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर कल्याणच्या रहिवासी असलेल्या आनंदीबार्इंनी ११ मार्च १८८६ ला एमडी ही वैद्यकीय क्षेत्रातील उच्च पदवी प्राप्त केली. या त्यांच्या कर्तृत्वाला सलाम करण्यासाठी महापालिका शिक्षण मंडळाचे माजी सदस्य अनिल काकडे यांनी आनंदीबार्इंचा अर्धाकृती पुतळा बसवण्यात यावा, अशी मागणी केली. २००५ मध्ये तत्कालीन महापौर हरिश्चंद्र पाटील यांच्या कारकिर्दीतील अखेरच्या महासभेत डॉ. जोशी यांचे स्मारक म्हणून रुक्मिणीबाई रुग्णालयाच्या आवारात पुतळा उभारावा, असा प्रशासनाकडील आलेला ठराव एकमताने मंजूर केला. याबाबत, २००७ मध्ये निविदा काढण्यात आल्या. परंतु, कार्यवाही पुढे सरकली नाही. स्मारक उभारणीसंदर्भात होत असलेल्या दिरंगाईच्या निषेधार्थ दोन वेळा काकडे यांनी लाक्षणिक उपोषण छेडले होते. मार्च २०१५ मध्ये त्यांनी बेमुदत उपोषणाचाही इशारा दिला होता. त्यानंतर, ११ वर्षांनी का होईना सत्ताधाºयांना भूमिपूजनाला मुहूर्त मिळाला. यात मार्च २०१६ मध्ये कल्याणचे खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते स्मारकाच्या कामाचे भूमिपूजन झाले. परंतु, तीन वर्षे उलटूनही स्मारक उभे राहू शकलेले नाही. यासंदर्भात केडीएमसी ‘ब’ प्रभाग कार्यालय बांधकाम विभागाचे उपअभियंता जगदीश कोरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी वरिष्ठ अधिकाºयांकडे बैठकीत व्यस्त असून नंतर संपर्क साधतो, असे सांगत अधिक बोलण्यास नकार दिला.
राजकीय वारसा नसल्याने उपेक्षा : स्मारकासाठी आवश्यक असलेल्या सर्व सरकारी परवानग्या मिळाल्या आहेत. पुढील परवानगीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठवला आहे. त्याच्या पाठपुराव्यासाठी केडीएमसीकडूनही प्रस्ताव जाणे आवश्यक आहे. परंतु, प्रशासनाकडून दिरंगाई चालू आहे. डॉ. आनंदीबाई जोशी यांना राजकीय वारसा नाही. त्यामुळेच स्मारकाची रखडगाथा सुरू असावी, असे खेदाने बोलावे लागते, असे शिक्षण मंडळाचे माजी सदस्य अनिल काकडे ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले.