डोंबिवली : एमआयडीसीतील कंपन्यांसाठी पाण्याची नवीन जलवाहिनी टाकण्यासाठी खोदकाम सुरू असताना तेथील रासायनिक सांडपाण्याच्या जलवाहिनीला तडा गेल्याने ती फुटली. त्यामुळे त्यातून काळे, निळे पाणी बाहेर आले, अशी माहिती प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी संजय भोसले यांनी ‘लोकमत’ला दिली.
रासायनिक कंपन्यांचे काळे, निळे पाणी थेट गटारात जात असल्याने प्रदूषण नियंत्रण मंडळ करतेय काय? असा सवाल एमआयडीसीतील रहिवाशांनी केला होता. तसेच सोशल मीडियावर व्हिडीओ, फोटो व्हायरल करून अनागोंदी कारभार उघडकीस आणण्याचा प्रयत्न जागरूक नागरिकांनी केला होता. मंडळाच्या अधिकाऱ्यांनी त्याची दखल घेत गुरुवारी तातडीने घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यावेळी वरील प्रकार उघडकीस आला.
भोसले म्हणाले की, ‘एमआयडीसीतील रहिवासी राजू नलावडे यांनी दिलेल्या माहितीनुसार आमच्या पथकाने तातडीने कल्याण-शीळ महामार्गावरील विको नाका परिसरात पाहणी केली. त्यावेळी तेथे एमआयडीसीकडून कंपन्यांना लागणाऱ्या पाण्याची जुनी काढून नवीन वाहिनी टाकण्यात येत होती. त्या कामादरम्यान जेसीबी अथवा अन्य यंत्रामुळे नजीक असलेल्या रासायनिक सांडपाणी वाहून नेणाºया वाहिनीला धक्का लागला. त्यामुळे ती वाहिनी तेथे फुटली. त्यामुळे तेथून काळे, निळे पाणी बाहेर आले आणि ते थेट बाजूच्या गटारात गेले. नलावडे यांची सूचना रास्त होती. पण त्यात प्रदूषण नियंत्रण मंडळाचा थेट संबध नव्हता, पण तरीही एमआयडीसीला सांगून तेथील सांडपाण्याच्या वाहिनीचे कामही करण्यात आले.’