ठाणे : कथा लिहिताना त्यात वाचकांशी संवाद साधलेला असावा आणि ती सादर करताना त्यात नाट्यमयता असावी पण नाटकीपणा टाळावा, असे स्पष्ट मत ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य अशोक चिटणीस यांनी व्यक्त केले.
कथा परिणामकारकतेने कथन करता येणे ही एक कला आहे. ही कला एखाद्या व्रतासारखी जोपासत आपल्या आयुष्यात आलेल्या अनुभवांवर ऐकणाऱ्यांशी संवाद साधल्यानेच मी आजवर यशस्वी कथाकथनकार झालो, असेही प्रा. चिटणीस म्हणाले.
कोकण मराठी साहित्य परिषद, ठाणे शहर शाखेच्या वाचन प्रेरणा दिनानिमित्त कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाचे आयोजन कोमसाप कट्टा, प्रिवा संकुल येथे करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर कोमसाप ठाणे शहर अध्यक्ष ॲड. मनोज वैद्य, प्रिवा संकुल येथील संगिनी संस्थेच्या अध्यक्ष मनिषा धबडगांवकर, संयोजक मिनल कांबळे उपस्थित होते.
उपस्थित प्रेक्षकांना संबोधित करताना प्रा. चिटणीस पुढे म्हणाले, कथाकथन करताना श्रोत्याने प्रेक्षकांशी संवाद साधत कथा सांगावी. शब्दफेक, स्पष्ट उच्चार, वाक्यांसाठी आवश्यक असणारे चढउतार या सगळ्यांची उत्तम तयारी असेल तर आपण सांगितलेली कथा ही ऐकणाऱयांना आपलीशी वाटते. यावेळी ‘साप आणि शिडी' या संग्रहातील एका कथेतून त्यांनी प्रेक्षकांशी संवाद साधला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना कोमसाप शहर अध्यक्ष ॲड. मनोज वैद्य यांनी कथाकथनाचे वाचनसंस्कृतीमधील महत्त्व सांगितले.
कथाकथन हा प्रकार एकेकाळी लोकप्रिय होता. द.मा. मिरासदार, शंकर पाटील, गिरीजा कीर, व्यंकटेश माडगुळकर यांचे कथाकथन ऐकले आहे. मोठमोठे साहित्यिक शाळाशाळांमधून कथाकथनाचे कार्यक्रम करायचे. त्यामुळे साहित्याविषयी लोकांमध्ये गोडी निर्माण झाली होती. यातूनच वाचनसंस्कृतीलाही मदत होत असे. परंतू आता साहित्यिक कथाकथनाचे कार्यक्रम करीत नाहीत. त्यामुळे हा प्रकार आता बंद होऊ लागला आहे. परंतू मुग्धा फाऊंडेशनच्या माध्यमातून प्रा. अशोक चिटणीस यांनी कथाकथनाचा कार्यक्रम सुरू ठेवला असून कथाकथनाचे प्रकार आता पुन्हा लोकप्रिय व्हावा, या दृष्टीने कोमसापही प्रयत्न करेल, असे ॲड. वैद्य यांनी सांगितले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनिषा धबडगांवकर आणि मिनल कांबळे यांनी केले तर श्वेता माळके यांनी आभार मानले.