ठाणे : ठाण्यात प्रथमच होणाऱ्या नाट्यसंमेलनाचा निधी जमवण्याला वेग आला आहे. यासाठी दोन कोटी खर्च अपेक्षित असून, आतापर्यंत धनादेशच्या रूपात १६ लाख रुपये जमले आहेत. कल्याण- डोंबिवलीच्या महापौरांनी आयोजकांकडे ११ लाख, तर डी. वाय. पाटील महाविद्यालयाचे पी. डी. पाटील यांनी पाच लाखांचा धनादेश आयोजकांकडे सुपूर्द केला. शिवसेनेच्या ठाण्यातील आमदारांनी आपल्या आमदार निधीतून पाच लाख देण्याचे जाहीर केले आहे, तर कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी खासदार निधीतून १० लाख, आमदार सुभाष भोईर यांनी पाच लाख देण्याचे कबूल केले. नाट्यसंमेलनाला निधी कमी पडणार नाही, असे आश्वासन पालकमंत्री आणि स्वागताध्यक्ष एकनाथ शिंदे यांनी दिले. या संमेलनात प्रत्येकाचा सहभाग असावा, वेगवेगळ््या क्षेत्रातील नागरिकांच्या सूचनांचा समावेश व्हावा, यासाठी विशेष बैठक गुरुवारी पार पडली. या वेळी स्वागताध्यक्ष शिंदे यांनी नाट्यसंमेलनात होणाऱ्या कार्यक्रमांचा थोडक्यात आढावा घेतला. अवघ्या पंधरवड्यानंतर म्हणजे १९, २०, २१ फेब्रुवारीला संमेलन होत असले, तरी त्या अगोदर सात दिवस शहरात वेगवेगळे कार्यक्रम होणार आहेत. नाट्य संमेलनाच्या वातावरण निर्मितीसाठी प्रत्येकाने आपल्या घरावर नाट्यसंमेलनाच्या लोगोसह कंदील लावण्याचे आवाहन त्यांनी ठाणेकरांना केले, तसेच महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांना या संमेलनातून भरीव मदत करणार असल्याचे सूतोवाच त्यांनी केले. या बैठकीला खासदार राजन विचारे, महापौर संजय मोरे, स्थायी समितीचे सभापती नरेश म्हस्के, आमदार सुभाष भोईर, ज्येष्ठ रंगकर्मी अशोक समेळ, ज्येष्ठ पत्रकार श्री. वा. नेर्लेकर, मिलिंद बल्लाळ, विद्याधर ठाणेकर, निवेदक नरेंद्र बेडेकर, प्रा. प्रदीप ढवळ, मराठी ग्रंथ संग्रहालयाचे अध्यक्ष मा. य. गोखले, टॅगचे अध्यक्ष अशोक नारकर, कल्याण-डोंबिवलीचे महापौर राजेंद्र देवळेकर, तसेच शहरातील विविध संस्था, महाविद्यालयीन युवक, व्यापाऱ्यांसह नागरिक उपस्थित होते.
नाट्यसंमेलनाला श्रीमंतीची झालर
By admin | Published: February 05, 2016 3:58 AM