- पंकज पाटीलअंबरनाथ : अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या यात्रेकरूंची यंदाच्या वर्षी अडचण होणार आहे. कारण यात्रेसाठी लागणारे मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट देण्याचे अधिकार यंदा एका जिल्ह्यात फक्त एकाच डॉक्टरांना म्हणजे जिल्हा शल्यचिकित्सकांना देण्यात आले आहेत. यापूर्वी तालुका स्तरावरील सरकारी डॉक्टरसुद्धा हे सर्टिफिकेट देऊ शकत होते, त्यामुळे यात्रेकरूंना हे सर्टिफिकेट सहज मिळत होते. मात्र यंदा हा नवीन नियम आल्याने आता प्रत्येक जिल्ह्यात फक्त सिव्हिल सर्जनला, हे अधिकार असणार आहेत.
अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या यात्रेकरूंना आधी रजिस्ट्रेशन करावे लागते, मगच यात्रेला जाण्याचे परमिट दिले जाते. हे परमिट देताना आधी सरकारी हॉस्पिटलच्या डॉक्टरांकडून शारीरिकदृष्ट्या यात्रेकरू सक्षम असल्याचा दाखला घ्यावा लागतो. हा दाखला देण्याचे अधिकार मागच्या वर्षीपर्यंत ग्रामीण रुग्णालय, तालुका रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनासुद्धा होते. मात्र यंदा प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हा शल्यचिकित्सकांनाच हे अधिकार देण्यात आले आहेत. ठाणे जिल्ह्यात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांना हे अधिकार आहेत. ठाणे जिल्ह्यातून दरवर्षी शेकडो भाविक अमरनाथ यात्रेसाठी जातात. हा आकडा दरवर्षी वाढतच असतो. यंदाही ही संख्या मोठी असू शकते.
‘मेडिकल सर्टिफिकेटवर नेमकी स्वाक्षरी कोणाची लागणार हे आधीच जाहीर करणे गरजेचे आहे. अमरनाथ यात्रेचे रजिस्ट्रेशन सुरू झाल्यावर आमचा गोंधळ उडत आहे. हजारो अमरनाथ यात्रेकरूंना ठाण्याला जाऊन मेडिकल सर्टिफिकेट घेणे हे अडचणीचे होणार आहे. एवढेच नव्हे तर मुख्य डॉक्टरांना देखील हा प्रकार त्रासदायक ठरणार आहे.- ॲड. महेश शर्मा, अमरनाथ यात्रेकरू
नवीन नियमाबाबत माहितीच नाही?यावर्षी या सर्व भाविकांना ठाण्याला जाऊन आपले मेडिकल सर्टिफिकेट आणावे लागेल, तरच या यात्रेकरूंना अमरनाथ यात्रेला जाण्याचे परमिट मिळेल. ही बाब अतिशय त्रासदायक असून इतक्या यात्रेकरूंची तपासणी करून त्यांना दाखला देणे ही जिल्हा शल्यचिकित्सकांसाठीही डोकेदुखी ठरणार आहे. त्यामुळे पूर्वीप्रमाणे तालुकास्तरावरील सरकारी डॉक्टरांना याबाबतचे अधिकार देण्याची मागणी यात्रेकरूंनी केली आहे. या सगळ्या गोंधळाबाबत ठाणे जिल्ह्याचे सिव्हिल सर्जन डॉ. पवार म्हणाले की, या नवीन नियमांबाबत आपल्याला कोणतीही माहिती नसून सकाळपासून आपल्याला मेडिकल सर्टिफिकेटसाठी अमरनाथ यात्रेकरूंचे अखंड फोन येत आहेत.