सदानंद नाईक
उल्हासनगर : कॅम्प नं-४ संतोषनगरातील तब्बल ७२० नागरिकांची घराची स्वप्न पंतप्रधान आवास योजने अंतर्गत पूर्ण होणार आहे. प्रांत अधिकारी जयराज कारभारी यांनी संतोषनगर झोलाडपट्टीच्या जागेला शुक्रवारी सनद दिल्याने, योजना कार्यान्वित होण्याचे संकेत उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी दिले.
उल्हासनगरातील जागेवर राज्य शासनाची मालकीहक्क असल्याने, कोणत्याही जागेचा विकास करतांना जागेची मालकीहक्क (सनद) घ्यावी लागते. महापालिकेने एकून १ हजार ६५ मालमत्तेला सनद मिळण्यासाठी प्रांत कार्यालयाकडे सविस्तर प्रस्ताव पाठवून पाठपुरावा केला. त्यानंतर महापालिका मुख्यालय, व्हिटीसी मैदान, इंदिरा गांधी।मार्केट, महापालिका शाळा, आयडिआय कंपनी जवळील कबरस्थान, गोल मैदान, हिराघाट अश्या १५ पेक्षा जास्त मालमत्ताना सनद मिळाली. दरम्यान पंतप्रधान आवास योजने अंतर्गत कॅम्प नं-४ येथील संतोषनगर झोपडपट्टीची निवड करून, त्यातील एकून ७२० नागरिकांना नवीन घरे देण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला. मात्र संतोषनगर झोपडपट्टीच्या जागेला मालकीहक्क (सनद) नसल्याने, सनद मिळण्यासाठी महापालिका उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी त्या जागेचा प्रस्ताव प्रांत कार्यालयाकडे पाठविला. प्रांत अधिकारी जयराज कारभारी यांनी सदर जागेला शुक्रवारी सनद दिली.
संतोषनगर झोपडपट्टीच्या जागेला सनद मिळाल्याने, पंतप्रधान आवास योजना कार्यान्वित होण्याला हिरवा कंदील मिळाल्याची प्रतिक्रिया उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी दिली. तर प्रांत अधिकारी जयराज कारभारी यांनी सनदची फाईल धुळखात न पडू देता. शुक्रवारी संतोषनगर येथील जागेला तसेच कॅम्प नं -५ येथील हिंदू स्मशानभूमीच्या शेजारील जागेला कबरस्थाना साठी सनद दिली. यामुळे मुस्लीम समाजाने आनंद व्यक्त केला. तर दुसरीकडे गरीब व गरजू नागरिकांना स्वतःचे हक्काचे घर मिळणार आहे. संतोषनगर झोपडपट्टीतील नागरिकांना पंतप्रधान आवास योजने अंतर्गत हक्काची घरे मिळणार आहे. त्यासाठी स्थानिक नगरसेवक धनंजय बोडारे, वसुधा बोडारे, वसुधा बोडारे, शिवसेना नेते चंद्रकांत बोडारे यांच्या पाठपुराव्यामुळे योजना कार्यान्वित होऊन ७२० नागरिकांना बहुमजली इमारती मध्ये घरे मिळणार आहे.
प्रांत अधिकारी कारभारी यांचे कौतुक
प्रांत अधिकारी जयराज कारभारी यांनी संतोषनगर झोपडपट्टीची मोजणी करून घराची यादी बनविली. गोरगरीब व गरजू शेकडो नागरिकांना पंतप्रधान आवास योजने अंतर्गत स्वप्नातील घरे मिळण्यासाठी झोपडपट्टीच्या जागेला (सनद) मालकीहक्क दिला. याप्रकारने नागरिक प्रांत अधिकारी जयराज कारभारी यांचे कौतुक करीत आहेत.