कुमार बडदे मुंब्रा : वाकळन गावातील इतर काही घरांप्रमाणेच एकमजली टुमदार घर बांधून राहण्याचे पाटील कुटुंबाचे स्वप्न अखेर स्वप्नच राहिले. रविवारी रात्री चार वर्षांच्या चिमुरडीसह आत्महत्या केलेल्या शिवराम आणि दीपिका पाटील यांना वडिलोपार्जित मालमत्तेमध्ये त्यांच्या वाट्याला आलेल्या चार गुंठा जागेतील जुन्या कौलारु घराच्या ठिकाणी एकमजली घर बांधायचे होते.पाटील यांच्या स्वप्नातील घराच्या तळमजल्याचा वापर ते राईस मीलचे सामान ठेवण्यासाठी गोदाम म्हणून, तर पहिल्या मजल्याचा वापर ते राहण्यासाठी करणार होते. आत्महत्या करण्याच्या आदल्या दिवशी, शनिवारी त्यांनी घर बांधण्याच्या कामाला सुरुवात केली होती. त्यासाठी त्यांनी घरावरील कौले काढणे सुरु केले होते. रविवारी घराची लाकडे काढत असताना त्यांच्या भावकीमधील काही जणांबरोबर वादावादी होऊन प्रकरण हाणामारीपर्यंत पोहोचले. रविवारी दिवसभर ठराविक वेळांनी घडलेल्या या घटनांमुळे मानसिकदृष्ट्या खचलेल्या पाटील दाम्पत्याने सामूहिक आत्महत्या करण्याचा टोकाचा निर्णय घेतला. त्यामुळे ज्या घराचे स्वप्न उराशी बाळगून त्यादृष्टीने त्यानी पहिले पाऊल टाकले होते, ते घराचे स्वप्न अखेर स्वप्नच राहिल्याची भावूक चर्चा वाकळन गावात सुरु होती.स्वप्नातील घर बांधण्यासाठी त्यांनी त्यांच्या वाट्याची पाच गुंठे जागा नुकतीच विकली होती. ती विकतानाही भावकीमधील काहींनी आडकाठी केली होती, अशी माहिती दीपिकाचे मामा धनेश पाटील आणि भाऊ श्रीनाथ केणे यांनी ‘लोकमत’ला दिली.
पाटील कुटुंबाचे घराचे स्वप्न अखेर स्वप्नच राहिले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2020 1:09 AM