प्रशांत माने।लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : ठाण्याहून कल्याण-डोंबिवलीपर्यंत रेल्वेमार्गाला समांतर रस्ता उभारण्याची घोषणा २६ जुलै २००५ च्या महाप्रलयानंतर राज्य सरकारने केली होती. कल्याण-डोंबिवलीचा विचार करता हा रस्ता ठाकुर्लीच्या म्हसोबा चौकापर्यंतच येऊन रखडला आहे. पुढे असलेल्या अतिक्रमणांवर उड्डाणपुलांचा पर्याय शोधला असला, तरी काम संथगतीने सुरू असल्यामुळे आजही मध्य रेल्वे ठप्प झाल्यास रेल्वेस्थानकांपासून भिवंडी बायपास अथवा कल्याण-शीळ या लांब अंतरावर असलेल्या मार्गांचा आधार घ्यावा लागत आहे.पंधरा वर्षांपूर्वी महापुरात रेल्वेमार्ग उखडल्याने किमान आठ ते दहा दिवस रेल्वेसेवा ठप्प झाली होती. लक्षावधी प्रवासी हे जागच्या जागी अडकून पडले होते. त्यामुळे ठाण्याहून डोंबिवली-कल्याणकडे येण्याकरिता रेल्वेला समांतर रस्ता करण्याची घोषणा केली होती. ती अजून कणभरही पुढे सरकलेली नाही. मध्य रेल्वेचे रडगाणे हे प्रवाशांसाठी नवीन नाही. कधी रुळाला तडा, कधी सिग्नल यंत्रणेत बिघाड, कधी ओव्हरहेड वायर तुटणे, कधी रुळांवर पाणी, कधी अपघात, तर कधी संप, अशा अनेक कारणांमुळे रेल्वेचा खोळंबा होत असतो. या सर्वांचा सर्वाधिक फटका दिवा, डोंबिवली आणि कल्याणपुढील प्रवाशांना अधिक बसतो. ठाणे ते कल्याणदरम्यानचा खाडीलगतचा रेल्वेमार्ग २६ जुलैला झालेल्या महाप्रलयात उखडला गेला होता. भविष्यात असे हाल पुन्हा होऊ नयेत, यासाठी तत्कालीन सरकारने केलेली रेल्वेला समांतर रस्ता बांधण्याची घोषणा अपूर्ण राहिल्याने भविष्यात महाप्रलयाची पुनरावृत्ती झाली, तर तेच हाल प्रवाशांच्या नशिबी येणार आहेत. २०११ ते २०१५ दरम्यान झालेल्या समांतर रस्त्याला कल्याण-डोंबिवली रेल्वे समांतर रस्ता असे जरी संबोधले जात असले, तरी हे काम ठाकुर्लीच्या म्हसोबा चौकापर्यंतच मार्गी लागले आहे.डोंबिवलीच्या दिशेला मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे आहेत. ती हटविणे शक्य नसल्याने समांतर रस्त्याच्या जोडणीला उड्डाणपुलाचा पर्याय शोधला आहे. परंतु, हे काम संथगतीने सुरू आहे. त्यात, बरीचशी जागा रेल्वेच्या हद्दीत असल्याने रेल्वे व केडीएमसी यांच्यात नसलेल्या समन्वयाचा फटका या कामाला बसला आहे. समांतर रस्त्याच्या मार्गात काही ठिकाणी अरुंद रस्ते आहेत तसेच एकदिशा मार्ग आहेत. याचाही अडथळा निर्माण होणार असल्याने समांतर रस्त्याचे स्वप्न खरोखरच पूर्ण होईल का, याबाबत शंका आहे. समांतर रस्त्याच्या प्रस्तावाला जलवाहतूक सेवा सुरू करण्याची घोषणा करून बगल दिली गेली. जलवाहतूक सेवा जरी लोकोपयोगी असली, तरी रेल्वे प्रवाशांच्या समस्येवर तोडगा काढणारी नाही. त्यामुळे समांतर रस्त्याचा प्रश्न मार्गी लागणे प्रवाशांच्या हिताचे आहे.गेल्या वर्षी अतिवृष्टीत पाणी भरल्याने रस्ता झाला ब्लॉकसद्य:स्थितीला कल्याण-डोंबिवली रेल्वे समांतर रस्ता दोन्ही शहरांना जोडणारा जवळचा पर्याय असला, तरी गेल्या वर्षी जुलै आणि आॅगस्टमध्ये झालेल्या अतिवृष्टीत या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना गुडघाभर पाणी साठून हा रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला होता. या परिसरात मोठ्या प्रमाणात गृहसंकुले उभी राहिली आहेत.नाले आणि गटारे बुजवून उभ्या राहिलेल्या या संकुलांमुळे पाणी निचरा होण्यास अडथळा निर्माण झाल्याने पाणी साचण्याची समस्या उद्भवल्याचे बोलले जाते. त्यामुळे भविष्यात अतिवृष्टी झाली तर पाणी तुंबण्याची समस्या पुन्हा उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही.
रेल्वेमार्गाला समांतर रस्त्याचे स्वप्न राहिले अधुरेच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2020 3:44 AM