ठाणे : 'लोकवस्ती मधे वंचिताचं आयुष्य जगणा-या युवकांनी आपण व आपले वातावरण या दोहोंचा बारकाईने विचार करावा व त्यावर विविध नाट्याविष्कार युवा नाट्य जल्लोषच्या यंदाच्या चौथ्या पर्वात सादर करावेत', असं आवाहन ठाण्यातील राष्ट्र सेवा दलाचे जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते व पर्यावरण दक्षता मंडळाचे प्रणेते डाॅ. विकास हजिरनीस यांनी समता कट्ट्यावर आयोजित युवा मेळाव्यात केले. यावेळी तलाव संस्थेच्या मयुरेश भडसावळे यांनी युवा नाट्य जल्लोषच्या चौथ्या पर्वाचे उदघाटन केले. अध्यक्षस्थानी समता विचार प्रसारक संस्थेचे डाॅ. संजय मंगला गोपाळ होते.
डाॅ. विकास हजिरनीस पुढे म्हणाले की, 'वस्तीतल्या लोकांमधे आरोग्याबाबत जागरूकतेचं महत्व लक्षात घेऊन चायनीज, कोला, सोडा आदी पदार्थांच्या सेवनाच्या दुष्परिणामांचा धांडोळा मुलांनी नाटकांमधून घ्यावा. वाहतूक नियमन न केल्याने होणारे हवा प्रदुषण, अनिर्बंध वृक्षतोडीमुळे कमी होणारे सावली व गारव्याचे आच्छादन, वस्तीत स्त्रियांमधेही आढळणारे तंबाखूच्या मशेरीचे व्यसन, अशा विविध मुद्द्यांवर लोकवस्तीतील युवक-युवतींना नव्याने अध्ययन करून नाट्यकृती बसवाव्यात, असंही ते पुढे म्हणाले. वस्त्यांधील गुंडागर्दी, मुलींची छेडाछेडी, कर्णकर्कश्य लाऊड स्पिकर्सचा गोंगाट आदींबाबत उपस्थित युवकांना बोलतं करत शहर नियोजन तज्ञ मयुरेष भडसावळे यांनी त्यांना आवाहन केलेे की या विरोधात आपण तोंड उघडत नाही व उघडलेच तर जाती वा धर्माचे आवाहन करत हा त्रास सहन करण्याची जबरदस्ती केली जाते. युवकांनी याबाबत अधिक जागरूक व संघटीत पवित्रा घेऊन प्रस्थापित राजकारण्यांचे हे षडयंत्र नाटकांधून उलगडले पाहीजे. अध्यक्षपदावरून बोलतांना संजय मं. गो. यांनी स्पष्ट केले की, 'नाट्य जल्लोष ही स्पर्धा नसून युवकांनी सभोवतालच्या स्थितीबाबतची त्यांची खदखद विधायकपणे व संविधानाच्या चौकटीत व्यक्त होण्याचे लोकमाध्यम आहे. इथून कसदार कार्यकर्ते कलाकार निर्माण व्हावेत असं सांगत त्यांनी जाहीर केले की, 'साने गुरूजी स्मृती निमित्ताने नाट्य जल्लोष जून महिन्यात संपन्न होईल. वंचितांच्या वस्ती गटांनी ५ मे पर्यंत नोंदणी करावी'. मतदाता जागरणच्या अनिल शाळीग्राम यांनी शाळा, आंगणवाडी, सीव्हील हाॅस्पीटल, क्लस्टर योजना आदींची माहीती दिली. यावेळी दहा लोकवस्त्यांमधील मोठ्या संख्येने उपस्थित युवकांनी नाट्य जल्लोष साठी प्राथमिक नोंदणी करतांना आपापल्या संभाव्य नाट्य विषय व कल्पना ऐकवल्या. किन्नरांचे आयुष्य, कचरा, स्वच्छता अॅप, सफाई कामगारांचे प्रश्न, नाले व तलाव, मुलींची छेडछाड, व्यसनाधिनता आदी मुद्द्यांचा विचार ते करत असल्याचे अनुजा जोहार, दुर्गा माळी, आतेश शिंदे, दीपक वाडेकर, निशांत पांडे या अनुभवी व गौतमी शिनगारे, तब्बसुम कुरेशी, स्मिता मोरे, केलास मंजाळ या नव्या युवकांनी मांडले. वाल्मिकी विकास संघाचे बाबुलाल करोतिया, व्यसनमुक्ती आंदोलनाचे अजय राठोड, कोळीवाड्यातील गिरीश साळगावकर, दिग्दर्शक विश्वनाथ चांदोरकर आदींनी या महोत्सवात युवकांना संपूर्ण सहकार्य करण्याची घोषणा केली. समता विचार प्रसारक संस्थेच्या मनिषा जोशी, हर्षलता कदम, सुनील दिवेकर, जेष्ठ साथी मंगेश खातू, उन्मेष बागवे, राहूल जोबनपुत्र आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.