बदलापूर : बडोदा-जेएनपीटी महामार्गाचे काम सध्या राज्यात प्रगतिपथावर आहे. हा महामार्ग बदलापूरमधून जात असून, त्यामुळे भविष्यात बदलापूरला थेट पनवेल आणि मुंबईची कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. सोबतच बदलापूरजवळ लॉजिस्टिक हब उभारणीला या महामार्गामुळे चालना मिळणार आहे. बदलापूर ते पनवेल ४.१६ किलोमीटरचा बोगदा तयार करण्यात येणार आहे.
पालघर जिल्ह्यातील तलासरी ते रायगड जिल्ह्यात पनवेल तालुक्यातील करंजाडे गावापर्यंत हा महामार्ग असेल. महाराष्ट्रात १८९ किमी लांब आणि १२० मीटर रुंद असा महामार्ग असेल. हा रस्ता बदलापूरजवळून जात आहे. बदलापूरच्या बेंडशीळ गावाजवळ सध्या या रस्त्याचे काम जोरात सुरू आहे. सोबतच बदलापूरहून पनवेल तालुक्यात जाण्यासाठी डोंगरातून बोगदा खोदण्याचे काम बेंडशीळ गावाजवळ सुरू करण्यात आले आहे. तब्बल साडेचार किमी लांबीचा हा बोगदा पूर्ण होण्यासाठी जून २०२५ पर्यंत वाट पाहावी लागणार आहे.
२ किमीपर्यंत काम पूर्णबदलापूरहून पनवेलच्या दिशेने एक किलोमीटर आणि पनवेलहून बदलापूरच्या दिशेने एक किलोमीटर अशा दोन किलोमीटरपर्यंतच्या बोगद्याचे काम पूर्ण झाले आहे. दोन्ही बाजूने सुरू केलेल्या बोगद्याचे काम डोंगराच्या मध्यभागी जोडले जाणार आहे. कामाला गती मिळावी यासाठी पनवेल आणि बदलापूर अशा दोन्ही बाजूने काम सुरू झाल्याने या बोगद्याचे काम लवकरात लवकर पूर्ण होईल, अशी अपेक्षा आमदार कथोरे यांनी व्यक्त केली आहे. या मार्गासाठी कल्याण तालुक्यातील रायते, बदलापूरच्या दहिवलीतून इंटरचेंज असणार आहे.
बडोदा-मुंबई महामार्गामधील सर्वांत महत्त्वाचा टप्पा या चार किलोमीटर बोगद्याचा असून, त्याचे काम जलदगतीने सुरू आहे. बोगद्यासोबतच महामार्गाचे कामही बदलापूर शहरात प्रगतिपथावर असून, ते काम जून २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. - सुहास चिटणीस, प्रकल्प अधिकारी, नॅशनल हायवे