स्टार १२१०
अनिकेत घमंडी
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : एका मर्यादेपेक्षा जास्त पाणी पिणे आरोग्याला अपायकारक ठरू शकते. तसेच कमी पाणी पिणे हेही शरीराला अपायकारक ठरू शकते, त्यामुळे किडनी स्टोन होऊ शकतो. त्यासाठी प्रत्येक नागरिकाने पाणी प्रमाणात प्यायला हवे, दिवसभरात पुरुषांनी साडेतीन लिटर, महिलांनी अडीच ते तीन लिटर पाणी आवर्जून प्यावे.
कामावर जाणाऱ्या महिला फार कमी पाणी पीत असल्याचे निदर्शनास आले आहे, त्यामुळे त्यांच्यात किडनी स्टोनसह अन्य तक्रारी वाढत आहेत. नोकरदार महिलांनी जास्त काळजी घ्यायला हवी. ज्या ठिकाणी एसी, थंड हवामान असते तिथे पाणी कमी प्यायले जाते. मात्र, बांधकाम साईट, उन्हात फिल्डवरील काम असते त्यांना पाणी जास्त लागते. या सर्व बाबी आपण कोठे काम करतो त्यावर अवलंबून असतात. त्यामुळे नेमकं किती पाणी प्यायला हवे, असे निश्चित सांगता येत नाही, असे तज्ज्ञ सांगतात.
-----------------------
शरीरात पाणी कमी पडले तर...
- किडनी स्टोन होऊ शकतो
- हृदयाचे विकार होऊ शकतात
- फुफ्फुसांना धोका होऊ शकतो
-----------------
शरीरात पाणी जास्त झाले तर...
- ज्यांना लिव्हरचा त्रास आहे त्यांनी जास्त पाणी पिऊ नये
- हृदयाचे आजार असलेल्यानी जास्त पाणी पिऊ नये
------------------
कुणाचे किती वय आहे, यानुसार पाणी पिणे अपेक्षित नसून उंची, वजन, वय यावर पाणी पिणे अवलंबून असते. तरीही साधारणपणे प्रत्येक व्यक्तीने दिवसाला तीन लिटर पाणी पिणे गरजेचे असते.
---------------
जास्त पाणी पिणे चांगले असले तरीही त्याचे विपरीत परिणाम होतात. त्यामुळे प्रमाणात आणि योग्य वेळेत पाणी पिणे महत्त्वाचे असते. कमी पाणी प्यायल्याने किडनी स्टोन, डिहायड्रेशन होऊ शकते तसेच थकवा जाणवू शकतो. लिव्हर, हृदयाचा त्रास असलेल्यांनी जास्त पाणी पिऊ नये. पाणी प्रमाणात पिणे चांगले.
- डॉ. दिनेश महाजन, नेफ्रॉलॉजिस्ट
...........