ठाणे : परराज्यातील भारतीय बनावटीच्या विदेशी मद्याची बेकायदा वाहतूक करणाऱ्या रईस शब्बीर शेख या कारचालकाला अटक केल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाने रविवारी दिली. या कारवाईमध्ये भरारी पथकाने कारसह दादरा नगर हवेली आणि दीव दमणमध्ये विक्रीसाठी असलेले भारतीय बनावटीचे विदेशी मद्य असा ११ लाख ३७ हजार ८७५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
परराज्यातील मद्याची ठाण्याच्या दिशेने घोडबंदर रोडवरून फाऊंटन हॉटेलमार्गे वाहतूक होणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ठाणे भरारी पथक क्रमांक एकचे निरीक्षक महेश घनशेट्टी यांना मिळाली होती. त्याच माहितीच्या आधारे कोकण विभागीय उपायुक्त प्रदीप पवार, ठाण्याचे अधीक्षक प्रवीण तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली धनशेट्टी यांच्यासह दुय्यम निरीक्षक एन. आर. महाले, एस. आर. मिसाळ, बी. जी. थोरात, सहायक दुय्यम निरीक्षक आर. बी. खेमनर, आर. एस. पाटील आणि एस. एस. यादव, आदींच्या पथकाने ३१ जानेवारी २०२५ रोजी दारूबंदी विरोधी गस्त घालत असतानाच सायंकाळी पावणेआठच्या सुमारास एका संशयित कारला त्यांनी थांबवून तपासणी केली. या तपासणीत कारमध्ये दादरा नगर हवेलीमध्ये विक्रीसाठी असलेले भारतीय बनावटीचे विदेशी मद्य आढळले. या छाप्यात मद्याचे ३९ बॉक्स जप्त केले. या गुन्ह्यांमध्ये पांढऱ्या रंगाच्या कारसह ११ लाख ३७ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. कारचालक शेख याला अटक केली. निरीक्षक धनशेट्टी हे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.