मीरा रोड : मीरा रोडच्या इंदिरा गांधी पालिका रुग्णालयात पत्राच्या खोलीत विजेचा प्रवाह उतरलयाने दाराजवळ हात लावताच शववाहिनीच्या वाहनचालकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला, तर अन्य दोन कर्मचाऱ्यांनाही विजेचा धक्का लागल्याची घटना सोमवारी (दि. १७) रात्री घडली. महापालिकेच्या हलगर्जीपणामुळे हा बळी गेल्याचा आरोप होत आहे.
तौक्ते चक्रीवादळामुळे मुसळधार पाऊस पडल्याने वाहनचालकांसाठी असलेल्या पत्र्याच्या खोलीत व बाहेर पाणी साचले होते. साेमवारी रात्री ११.३० च्या सुमारास शववाहिनीचे चालक धर्मलिंगम मुत्तू (वय ६०, रा. डॉ. आंबेडकरनगर, भाईंदर पश्चिम) हे कामाची वेळ संपल्याने पत्र्याच्या खोलीत नोंदवहीमध्ये नोंद करण्यासाठी गेले हाेते, तर रात्रपाळीचे राजेंद्र खेडेकर हे पालिका रुग्णवाहिकेचे कर्मचारी आत बसले होते. त्याच वेळी पत्र्याचे दार आणि पाण्याशी स्पर्श होताच धर्मलिंगम यांना विजेचा जबर धक्का बसून ते खाली कोसळले. खेडेकर यांनी प्लास्टिक खुर्चीतून पाय खाली ठेवताच त्यांनाही विजेचा धक्का बसून ते खाली पडले. त्यांनी सुरक्षारक्षकास कळवले असता वॉर्डबॉय धावून आले. त्यांनाही शॉक लागला. त्यानंतर मुख्य स्विच बंद केला. मात्र तोपर्यंत धर्मलिंगम यांचा मृत्यू झाला होता. खेडेकर याना भीमसेन जोशी रुग्णालयात दाखल केले. धर्मलिंगम हे पालिकेच्या सेवेतून निवृत्त झाल्यानंतर ठेकेदारामार्फत पालिकेत काम करीत होते.
पक्क्या खाेलीत सिमेंटच्या गाेणी
मीरा-भाईंदर महापालिकेचे मीरा रोडच्या पूनमसागर वसाहत भागात भारतरत्न इंदिरा गांधी रुग्णालय आहे. या इमारतीवर मजले वाढविण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी रुग्णालयातील वाहनचालकांची पक्की खोली पालिकेच्या बांधकाम विभागाने ठेकेदारास सिमेंट, आदी वस्तू ठेवायला दिली आहे; तर वाहनचालकांना पत्र्याची खोली बांधून दिली आहे. पालिका-नगरसेवकांच्या ठेकेदारधार्जिण्या प्रकारामुळे हा बळी गेल्याचा संताप श्रमजिवी कामगार संघटनेचे कार्याध्यक्ष सुलतान पटेल यांनी केला आहे. विजेच्या वायर आणि वीज उपकरणांच्या सुरक्षिततेची खबरदारी न घेतल्यानेच ही घटना घटल्याचे पटेल म्हणाले.