ठाणे: आधी भाडयाने जीप घेऊन नंतर त्याच जीपचा आणखी एका अपहरण आणि खंडणीच्या गुन्ह्यांसाठी वापर करण्यासाठी जबरी चोरीचा डाव हाणून पाडणा-या मधूकर उर्फ बबलू दाजी उमवणे (४२, रा. मानिवली, मुरबाड) याचा खून करण्यात आला. याप्रकरणी स्वप्निल वरकुटे (१९) याच्यासह चौघांना ठाणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे.मानिवली येथील रहिवाशी बबलू हा मुरबाड परिसरात खासगी जीपचा चालक होता. तो ८ नोव्हेंबर रोजी दुपारी बदलापूर येथील भाडे घेऊन गेल्यानंतर जीपसह तो बेपत्ता झाला होता. त्यानंतर ९ नोव्हेंबर रोजी काकडपाडा (टिटवाळा) येथे त्याची जीप रक्ताने माखलेल्या अवस्थेत मिळाली. तर चार दिवसांनी ११ नोव्हेंबर रोजी मुरबाड बदलापूर रस्त्यावर मासले बेलपाडा गावाच्या जंगलात बबलूचा मृतदेह आढळला होता. त्यानंतर याप्रकरणी त्याचा भाऊ उमेश उमवने यांनी खून आणि पुरावा नष्ट केल्याप्रकरणी मुरबाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक महेश पाटील यांच्या आदेशाने मुरबाड पोलीस ठाण्याचे अजय वसावे तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक व्यंकट आंधळे यांची संयुक्त पथके तयार केली.स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख यांनी सरळगाव मार्गावरील सीसीटीव्ही फूटेजची तपासणी केली. त्यानुसार तांत्रिक माहितीच्या तसेच खबºयांनी दिलेल्या माहितीच्या आधारे स्वप्निल वरकुटे (१९, रा. उशिद, फळेगाव, कल्याण), विजय वाघ (२५, रा. भुवन, मुरबाड), किरण मलीक (१९, रा. वाचकोले, खरीवली, शहापूर), आणि किरण हरड (१९, रा. खरीवली, शहापूर, जि. ठाणे) या चौघांना १८ नोव्हेंबर रोजी रात्री अटक केली. त्यांना न्यायालयाने २३ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी दिली. या चौकशीतच त्यांनी संपूर्ण खूनाची माहिती पोलिसांना दिली.
असे घडले खूनाचे नाटय...बदलापूरला जायच्या नावाखाली बबलूची सुमो वरकुटे आणि त्याचा साथीदार सोन्या उर्फ लक्ष्मण या दोघांनी ८ नोव्हेंबर रोजी भाडयाने घेतली. सरगावजवळ बैलबाजारकडे त्यांचे आणखी तीन साथीदार या गाडीत बसले. मात्र, बैल पाडा आल्यानंतर त्यांनी बबलूला गाडी बाजूला घेण्यास सांगितले. तिथे त्याच्या गाडीचीच मागणी त्याच्याकडे त्यांनी केली. त्याने विरोध करताच सोन्याने बबलूला मागून दोरीने आवळले. तर विजयने गळयावर अत्यंत निर्घृणपणे चाकूने वार केला. मोठया प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्याचा जागीच मृत्यु झाला. जीपमध्ये रक्तस्त्राव झाल्याने त्यांनी घाबरुन ही गाडी नेण्याचा निर्णय रद्द केला. नंतर मुरबाडच्या दिशेने जंगलात त्याचा मृतदेह त्यांनी फेकून दिला. तर वाशिम बाजूकडे गाडी लपवून ते पसार झाले होते.सीसीटीव्ही आणि ५६३ मोबाईल धारकांच्या चौकशीनंतर एपीआय बडाख, उपनिरीक्षक एन. एस. करांडे, सागर चव्हाण, जमादार अनिल वेळे, नाईक अशोक पाटील, संजय शिंदे आदींच्या पथकाने या चौघांच्या मुसक्या आवळल्या. यातील मुख्य सूत्रधार लक्ष्मण घुडे उर्फ सोन्या हा मात्र अद्यापही फरार असून त्याचा शोध घेण्यात येत आहे.निरुपणकार असूनही खूनबबलूचे कोणाशीही शत्रूत्व नव्हते. त्याचे कोणाशी अनैतिक संबंध किंवा पैशाचा वादही नव्हता. तो बैठकीमध्ये निरुपणकार असल्याने त्याचा खून कसा आणि कोणी केला हे शोधणेही पोलिसांना मोठे आव्हान होते. कोणताही धागादोरा नसतांना सात दिवसांच्या तपासानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा अखेर छडा लाावला.अपहरणासाठी होती गाडीची गरजलक्ष्मण घुडे आणि त्याच्या टोळीने एका मोठया व्यक्तिचे अपहरण करुन त्यांच्या कुटूंबियांनीकडून मोठी खंडणी उकळायची योजना आखली होती. त्यासाठी त्यांना एका वाहनाची गरज होती. त्यानुसार त्यांनी बबलूची सुमो जबरदस्तीने हिसकावण्याचा प्रयत्न केला. त्याने त्याला विरोध केल्यानेच त्यांनी त्याचा खून केल्याचे तपासात उघड झाल्याचे निरीक्षक व्यंकट पाटील यांनी ‘लोकमत’ला सांगितले.