ठाणे : ठाणे ते अलीमघरच्या दिशेने निघालेल्या टीएमटीचा पारसिकनगर येथे ब्रेक फेल झाल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. परंतु, चालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे बसमधील सुमारे ४५ प्रवाशांचा जीव वाचला आहे. चालकाने लागलीच गाडी रस्त्याचे काम सुरू असलेल्या ठिकाणी खाली उतरवली. परंतु, या गडबडीत काही प्रवाशांनी चालत्या बसमधून उड्यादेखील मारल्या. परंतु, सुदैवाने तेदेखील सुखरूप बचावले आहेत.ठाणे स्टेशन ते अलीमघर मार्गावर अर्धा ते पाऊण तासाच्या अंतराने या बसच्या फेºया असल्याने तिला नेहमीच कोणत्याही वेळेस गर्दी असते. त्यामुळे दुपारची वेळ असतानादेखील या बसमध्ये सुमारे ४० ते ४५ प्रवासी होते. ती पारसिकनगर येथे पोहोचली असता, येथील स्थानकावर प्रवाशांना उतरायचे होते. त्यामुळे चालक चोरगे यांनी बसचा ब्रेक दाबण्याचा प्रयत्न केला. परंतु, ब्रेक काही लागला नाही. त्यामुळे गाडीचे ब्रेक फेल झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यातही प्रवाशांना उतरायचे असल्याने त्यांनी बस थांबवण्याची विनंतीदेखील केली. परंतु, बस काही थांबत नव्हती. त्यामुळे काही प्रवाशांनी बसमधून उड्या मारून आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे या वेळेस बसचा वेग कमी असल्याने उडी मारलेल्या प्रवाशांचा जीव वाचला. दरम्यान, उर्वरित प्रवाशांना वाचवण्यासाठी चालकाने गाडी तत्काळ रस्त्याच्या खाली उतरवली. या ठिकाणी रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम सुरू असल्याने बस रस्त्याच्या खाली उतरताच थांबली अन् ती मधील सर्वच प्रवाशांचा जीव वाचला.
चालकाने वाचवले ४५ प्रवाशांचे प्राण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 09, 2017 1:15 AM