- नंदकुमार टेणीठाणे : महाराष्ट्र राज्य मार्ग परीवहन महामंडळाने म्हणजेच एस.टी.ने मोठा गाजावाजा करून सुरू केलेल्या शिवाशाही या बसेस चालविण्यास एस.टी.चेच चालक नकार देत आहेत. अनेकांचा कल हा तिची ड्युटी न घेण्याकडे आहे. याचे कारण ती चालवताना तिचे काही नुकसान झाले तर त्याच्या भरपाई पोटी कापली जाणारी पगाराच्या अनेक पटीतील रक्कम व त्यांना पुरेशी गती नसतांनाही तिच्या चालकाच्या ओव्हरटाइममध्ये करण्यात आलेली कपात हे आहे.शिवशाही या बसची बांधण्यात आलेली बॉडी ही अत्यंत महागडी आहे. तिच्या दर्शनी भागाला दोन्हीकडे लावलेल्या एकेका आरशाची किंमत ३५ हजार रुपये आहे. वास्तविक तिथे साधा आरसाही चालू शकला असता परंतु भपका दाखविण्यासाठी हे महागड्या आरशाचे चोचले केले जात असून त्याचा फटका हा चालकांना बसणार आहे. काहींना तो बसलाही आहे.सध्या सगळीकडेच वाहतूककोंडी आहे. दुचाकीचालक बेशिस्तीने गाड्या चालवतात रिक्षा आणि छोटी मालवाहू वाहने कोणतेच नियम पाळत नाही. अशा स्थितीत जर शिवशाहीच्या बसला चरा गेला अथवा ओरखडा ओढला गेला तरी त्याच्या दुरुस्तीसाठी किमान २५ हजार रुपये मोजावे लागतात. त्याची रिकव्हरी संबंधीत चालकाच्या पगारातून होते. पगार ९ ते १० हजार रुपये आणि त्यासाठी नोकरी करतांना शिवशाहीचे नुकसान झाले तर त्याच्या भरपाईपोटी ३ महिन्यांचा पगार जाणार. असाच प्रकार तिच्या हेड आणि टेल लॅम्प याबाबत आहे. त्यामुळे या गाडीचे चालक होण्यात असंख्य चालक नाराज आहेत. अनेकांनी कुठलीही ड्युटी द्या, पण शिवशाहीची नको असा खाक्याच अनुसरला आहे.वाहतूककोंडीमुळे सर्वच एस.टी. चालकांना वेळापत्रकानुसार आपली गाडी चालवणे शक्य होत नाही. विशेषत: लांबपल्ल्याच्या चालकांना बरीच रखडपट्टी सोसावी लागते. त्यात गाड्यांना स्पीड गव्हर्नर बसवलेले म्हणजे दुष्काळात तेरावा. अशा स्थितीत पूर्वी गाडी उशिरा आली तर जो पावणेदोन तासांचा ओव्हरटाइम चालकांना मिळायचा तो आता पाऊण तासांवर आणला आहे. म्हणजे पूर्वी जर गाडीला नियोजित वेळेपेक्षा दोन-तीन तास कधी चार तास उशीर झाला तर पावणेदोन तासांचा ओव्हरटाइम गृहीत धरला जायचा. त्यातून पगारात थोडीफार भर पडायची. आता शिवशाहीच्या प्रवासाला कितीही उशिर झाला तरी पाऊणतासाचाच ओव्हरटाइम गृहीत धरला जातो. अशा स्थितीत चालकाने काम करायचे तरी कसे? असा सवाल एसटीच्या चालकांनी लोकमतशी बोलताना नाव न सांगण्याच्या अटीवर केला. याबाबत संघटना लक्ष घालत नाही. वरीष्ठ दुर्लक्ष करतात यात मरण मात्र आमचे होते. अशी भावना त्यांनी व्यक्त केली.एसटीचे पीआरओ म्हणतात...!सध्या २५०च्या आसपास शिवशाही ताफ्यात आहेत. त्यापैकी ५०-६० गाड्यांवरच मंडळाचे चालक आहेत. ओव्हर टाईममध्ये केलेली कपात ही रस्ते सुस्थितीत असल्याने केली आहे.शिवशाहीचे काही नुकसान झाल्यास त्याची चौकशी केल्यानंतरच वसूली चालकाकडून केली जाईल. असे एसटीचे पीआरओ अभिजीत भोसले यांनी लोकमतला सांगितले.
एसटीचे चालक लागले ‘शिवशाही’पासून दूर पळू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2018 1:19 AM