ठाणे : ठाणे पोलीस शहरातील महत्त्वाच्या सिग्नल परिसरात स्वयंसेवकांच्या मदतीने हेल्मेट परिधान करणे टाळणाऱ्या आणि सिग्नल मोडणाऱ्या वाहनचालकांना सिग्नल परिसरातच उभे करून त्यांच्याकडून वाहतूक नियमांसंबंधी जनजागृती करून घेणार आहेत. गुरुवारपासूनच हा अभिनव उपक्रम राबवण्यात येणार आहे.
त्यानुसार वाहनचालकांनी सिग्नल मोडल्यास दंड वसूल केला जाणार नसून, त्याऐवजी त्यांनाच १५ ते २० मिनिटे सिग्नलवर जनजागृती करावी लागणार आहे. केंद्र सरकारच्या नव्या मोटार वाहन कायद्याची अंमलबजावणी राज्यभरात सुरू झाली आहे. या नव्या कायद्यामुळे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांच्या दंडाच्या रकमेत दुप्पट वाढ झाली आहे. ई चलान कार्यपद्धतीमुळे कारवाई होत असली तरीही नियमांचे उल्लंघन सुरूच आहे. प्रत्येक महिन्यात ठाणे शहरात नियम मोडणाऱ्यांचे प्रमाण हे हजारांच्या घरात असते.
दुचाकी चालविताना हेल्मेटचा वापर टाळणाऱ्यांचा आणि सिग्नल लाल रंगाचा असतानाही तो ओलांडणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. अशा वाहनचालकांविरोधात कारवाईसाठी नवी शक्कल लढविली आहे. त्यानुसार ठाणे शहरातील महत्त्वाच्या सिग्नल परिसरात वाहतूक पोलिसांचे कर्मचारी आणि काही स्वयंसेवक उभे राहणार आहेत.
दुचाकी चालविताना हेल्मेट परिधान करणारे आवश्यक आहे. अनेक वाहनचालक या नियमाचे उल्लंघन करतात. त्यामुळे अपघात घडण्याचे प्रमाण अधिक आहे. अनेकांचे यामुळे मृत्यूही झालेले आहेत. लाल रंगाचे सिग्नल असतानाही वाहनचालक तो ओलांडताना दिसतात. अशा वाहनचालकांना १५ ते २० मिनिटे सिग्नलवर जनजागृती करावी लागणार आहे. वाहनचालकांमध्ये शिस्त निर्माण व्हावी, एवढाच यामागचा उद्देश आहे. - बाळासाहेब पाटील, पोलीस उपायुक्त, ठाणे वाहतूक शाखा