अनिरुद्ध पाटील, डहाणूयेथील चिखले गावच्या दलीत वस्तीत पाणी प्रश्न बिकट बनल्याने येथील महिलांनी सावकाराकडे मंगळसूत्र गहाण ठेऊन कुपनालिका खोदल्या होत्या. ही पाणीबाणी लोकमतने बातमीतून मांडल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले होते. त्यानंतर तत्काळ दोन विहीरींचा गाळ उपासण्यासह पाणी पुरवठ्याची योजना कार्यान्वित करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. दरम्यान, वस्तीला लवकरच पाणी मिळणार असून ठप्प पडलेली जुनी योजना पुनर्जीवित केली जाणार आहे. मागील तीन वर्षांपासून या वस्तीत पाणी प्रश्न बिकट बनल्याने नागरिकांना भीषण टंचाईला सामोरे जावे लागत होते. स्थानिक प्रशासन लक्ष देत नसल्याने भर उन्हाळ्यात कुटुंबाची दैना पाहून दलीत महिलांनी २०१५ मध्ये मंगळसूत्र सावकाराकडे गहाण टाकून कुपनालिका खोदून नळ योजना केली. लोकमतने हा विषय बातमीतून मांडल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले. तत्काळ दोन विहीरीतील गाळ उपसून नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर करण्याचे आश्वासनही देण्यात आले. दरम्यान चिखले ग्रामपंचायतीकडून चौदाव्या वित्त योजनेतून २ लक्ष ६० हजार रुपयाची नळ योजना राबविण्यात येणार आहे. लवकरच प्रत्यक्ष कामाला प्रारंभ केला जाणार आहे. काही वर्षांपूर्वी दलीत वस्ती योजनेतून राबवलेली आणि तांत्रिक कारणास्तव सद्यास्थितीत बंद असलेल्या योजनेचेही पुन:जीवन करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी मनोज इंगळे यांनी दिली. सुरळीत पाणी पुरवठयामुळे या वस्तीला खऱ्या अर्थाने अच्छे दिन येणार असून मंगळसूत्र गहाण ठेयणाऱ्या महिलांच्या प्रयत्नांना यश आले आहे.
चिखले दलित वस्तीला लवकरच पाणी मिळणार
By admin | Published: February 25, 2017 2:48 AM