भिवंडी : मादक पदार्थांच्या सेवनामुळे व्यसनाधीनतेच्या आहारी जाऊन फक्त युवा पिढीचे, समाजाचे नुकसान होत नाही तर देशाचेही फार मोठे नुकसान होत आहे, कारण या मादक पदार्थाच्या व्यवसायातील अनिर्बंध पैसा हा देशविघातक कारवाया करण्यासाठी अतिरेकी संस्थांच्या हातून वापरला जातो आणि त्यासाठी मादक पदार्थांच्या व्यसनापासून युवा वर्गाने दूर राहण्याची गरज आहे असे मत आय आर एस अधिकारी समीर वानखेडे यांनी मांडले. शानिवारी ते भिवंडी येथील इंद्रपाल बाबुराव चौघुले विधी महाविद्यालयात आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते.याठिकाणी मुंबई येथील आत्मसन्मान मंच या संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यां साठी " महिलांना सन्मानाने काम करण्याचा अधिकार,समस्या व आव्हाने " या विषयावर मार्गदर्शन सभेचे आयोजन केले होते. या प्रसंगी महाविद्यालयाचे कार्यकारी अध्यक्ष श्याम बाबुराव चौघुले,आत्मसन्मान मंच संस्थेचे नित्यानंद शर्मा,प्राचार्या डॉ.गायत्री पाटील यांच्यासह महाविद्यालयाचे शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रत्येकाने आपल्या आयुष्यात संघर्ष हा प्रेरणास्रोत ठेवून मार्गक्रमण केले तर अपयश कधीच कोणाला येणार नाही, म्हणून मी सदैव काम करताना सत्याची लढाई लढत असल्याने मला कोणाचे भय बाळगण्याची गरज नाही.विचारमंच या सामाजिक चळवळीच्या व्यासपीठावरून आपण नशा मुक्ती, रक्तदान,अवयव दान, केंद्रीय व राज्य स्तरीय प्रशासकीय सेवेसाठी युवकांना प्रशिक्षण हे ध्येय ठेवून कार्य करीत असल्याचे समीर वानखेडे यांनी शेवटी सांगितले.या वेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे सुध्दा समीर वानखेडे यांनी दिली.
कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना शाहरुख खान यांच्या जवान या चित्रपटाच्या प्रमोशन संदर्भात समीर वानखेडे यांनी ट्विट केलेले विधान चर्चेत असल्याने त्या संदर्भात समीर वानखेडे यांना विचारले असता कोणता चित्रपट? कोण हिरो? मी कोणाला ओळखत नाही असे सांगत ज्यांचा आदर्श भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर,छत्रपती शिवाजी महाराज आहेत त्यांना कोणत्या हिरोची गरज नाही अशी प्रतिक्रिया वानखेडे यांनी दिली आहे.