भिवंडी : गुजरातच्या दहशतवादविरोधी पथकाने ज्या फरिदा मंजिल इमारतीमधून ८०० कोटींचे ७९२ किलो लिक्विड एमडी ड्रग्ज हस्तगत केले, त्या इमारतीमध्ये गेल्या ९ महिन्यांपासून हा गोरखधंदा सुरू होता. स्थानिक पोलिसांना त्याचा मागमूसही लागला नाही की माहिती मिळूनही त्यांनी कारवाई टाळली, अशी पोलिसांच्या अकार्यक्षमतेवर टीका सुरू झाली.
गुजरातच्या दहशतवादविरोधी पथकाने कारवाई केल्यानंतर दोन दिवसांनंतर स्थानिक पोलिसांना कारवाईची माहिती दिली, हाच स्थानिक पोलिसांच्या अविश्वासार्हतेचा पुरावा मानला जात आहे. गुजरात पोलिसांनी भिवंडीत केलेल्या कारवाईमुळे पोलिसांच्या बेपर्वाईवर समोर आली. नाशिक, पुणे ड्रग्ज रॅकेट प्रकरण शांत झाले असतानाच संवेदनशील भिवंडी अमली पदार्थांचे माहेरघर बनत चालले आहे.
इमारत कामवारी नदीपात्राच्या बाजूस - गुजरात दहशतवादविरोधी पथकाने तीन दिवसांपूर्वी भिवंडीत मोठी कारवाई करून मोहम्मद युनूस, मोहम्मद आदिल यांना अटक केली. - ज्या इमारतीत हा गोरखधंदा सुरू होता, ती इमारत शहरालगतच्या कामवारी नदीपात्राच्या बाजूलाच आहे. या घटनेआधी भिवंडीत ड्रग्जमाफियांवर कारवाई केली आहे. - गेल्या महिन्यात १७ जुलै रोजी शहरात २ लाख ६६ हजार रुपये किमतीचा एमडीचा साठा बाळगणाऱ्या मोहम्मद साबीर शाह मोहम्मद खान (वय ४२ वर्षे, रा. धामणकर नाका) यास भोईवाडा पोलिसांनी अटक केली.- २२ जुलै रोजी कसाईवाडा येथील शबाना अन्वर कुरेशी हिला अटक करून तिच्याजवळून २ किलो २ ग्रॅम वजनाचे २० लाख ७५ हजार रुपये किमतीचे ड्रग्ज जप्त केले.
पडक्या इमारती, मोकळी मैदाने, जंगलाचा भाग नशेखोरांचे अड्डेएक ग्रॅम एमडी पावडरची किंमत भिवंडीत १५०० ते २००० हजार रुपये आहे. शहरात पानमसाला सुपारीत एमडी पावडर मिळवून तरुण नशा करत असल्याची माहिती आहे. एमडी पावडर महाग असल्याने मित्रमंडळी भागीदारीत एमडी खरेदी करतात. शहरात एमडी पावडर ही कल्याण, मुंब्रा, मुंबई व आजूबाजूच्या ठिकाणाहून येते.
मुंबई-नाशिक महामार्गावरील रांजनोली नाका बायपास रस्त्यावर याची खरेदी-विक्री होते. शहरातील गजबजलेल्या ठिकाणी अमली पदार्थांची खरेदी-विक्री होते. शहरातील मुस्लिमबहुल झोपडपट्टी भागात या पदार्थांची खरेदी-विक्री होते.
शांतीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत हे प्रकार जास्त असल्याचे सूत्रांनी सांगितले. धोकादायक पडक्या इमारती, मोकळी मैदाने, बंद कारखाने, पाइपलाइन रस्ता, जंगलाचा भाग हे नशेखोरांचे प्रमुख अड्डे आहेत.
नशेखोरीमुळे महिला, अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. भिवंडी पोलिसांकडून शहरातील ड्रग्ज माफियांवर कारवाई होणे गरजेचे असताना पोलिस फक्त गांजा पिणाऱ्यांवर कारवाई करण्यात गर्क आहेत.